०४-०९-२०२५ | डीएनए अंगुलीमुद्रण : नैसर्गिक ओळखपत्र

नुकताच अहमदाबादला भीषण विमान अपघात झाला. आपल्या नातेवाईकांची ओळख पटवण्यासाठी लोकांची रीघ लागलेली होती. जळून गेलेले मृतदेह ओळखायचे कसे? नातेवाईक आले होते त्यांच्या रक्ताचे नमुने देण्यासाठी! अर्थातच त्यांचा डीएनए देण्यासाठी. तो कोणाशी जुळतो ते ठरवण्यासाठी! डीएनए अंगुलीमुद्रण म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग.

बोटांच्या ठशांचा वापर आपण ओळख पटवण्यासाठी जसा करतो ना, तसेच कोणत्याही दोन व्यक्तींच्या जनुकांची अर्थात डीएनएची छायाचित्रे वेगळी असतात. म्हणून एखाद्या व्यक्तीची त्याच्या जनुकीय (डीएनए) विश्लेषणाद्वारा ओळख करून घेण्याच्या तंत्राला ‘डीएनए अंगुलीमुद्रण’ म्हणतात. शब्दाला जसा अक्षरांचा एक क्रम असतो त्याच पद्धतीने डीएनएमध्ये न्युक्लिओटाईड्सचा क्रम महत्वाचा असतो. जगातील प्रत्येक व्यक्तीचा डीएनए थोड्या फरकाने वेगळा असतो (जुळ्या भावंडांना वगळता) आणि त्याच्या याच वैशिष्ट्याचा उपयोग ओळख पटवण्यासाठी होतो. माणसाच्या जीनोमचा (पेशीतील संपूर्ण डीएनए) विचार केला तर त्यातील ९९% डीएनए सर्व व्यक्तींमध्ये सारखाच असतो पण उरलेल्या १% डीएनए मधील काही भाग हे व्यक्तिपरत्वे वेगळे असतात व ते डीएनएच्या ‘पॉलीमॉर्फिक’ भागात आढळतात. म्हणून या तंत्रज्ञानामध्ये वैज्ञानिक पॉलीमॉर्फिक भागांचा विशेष अभ्यास करतात. प्रत्येक व्यक्तीच्या ‘पॉलीमॉर्फिक’ डीएनएची लांबी, त्यातील न्युक्लिओटाईड्सची पुनरावृत्ती किंवा त्यांच्या क्रमवारीत फरक असतो. उदाहरणार्थ काही ठिकाणी ४-५ न्युक्लिओटाईडची मालिका एका व्यक्तीत १० वेळा येते, तर दुसऱ्यात ती फक्त ७ वेळा येते.

डीएनए फिंगरप्रिंटिंगचे तंत्र प्रथम १९८४मध्ये ब्रिटिश शास्त्रज्ञ अलेक जेफ्रीज यांनी विकसित केले. यामध्ये लाळ, रक्त, केसांचे मूळ, त्वचा, वीर्य व इतर जैविक नमुन्यांतून डीएनए वेगळा केला जातो. त्या नंतर पीसीआर (पॉलिमरेज चेन रिएक्शन) तंत्राच्या सहाय्याने पॉलीमॉर्फिक भागामधील डीएनएच्या अनेक प्रती तयार करतात. विशिष्ट प्रकारच्या रेस्ट्रिक्शन विकराच्या सहाय्याने या पॉलीमॉर्फिक डीएनएचे वेगवेगळ्या आकाराचे अनेक तुकडे केले जातात.नंतर हे तुकडे विद्युतप्रवाहाच्या मदतीने (जेल इलेक्ट्रोफोरेसीस तंत्राने) जेलमध्ये त्यांच्या आकारानुसार वेगळे करून रंगीत पट्ट्याच्या स्वरुपात मिळवले जातात. हे सर्व रंगीत पट्टे म्हणजेच त्या व्यक्तीचा डीएनए फिंगरप्रिंट! यांच्यातील साम्य ओळखून पालकत्वाचा वाद सोडविता येतो, मूल आणि मातापिता यांचा संबंध शोधता येतो. एखाद्या गुन्ह्यात गुन्हेगाराची ओळख पाठविता येते, किंवा मृत व्यक्ती ओळखण्यासाठी याचा उपयोग होतो. थोडक्यात, शरीरातील डीएनए म्हणजे एक नैसर्गिक ओळखपत्र आहे.

डॉ. गजानन विष्णू माळी