६-५-२०२५ | वाळवंटातले मरुवन

मरुवन (ओअॅसिस) हा पृथ्वीवरच्या विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशात आढळणारा एक मनोवेधक आणि विस्मयकारी आविष्कार आहे. जगातील मोठमोठ्या वाळवंटी प्रदेशात सतत वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वाळवंटाच्या एखाद्या भागातून वाळू वर उचलली जाते, आणि ती दूर अंतरावर नेऊन टाकली जाते. या प्रक्रियेला ‘अपवहन’ किंवा ‘सखलीकरण’ (डिफ्लेशन) असे म्हटले जाते. वाळू जिथून उचलली गेली त्या ठिकाणी एक विस्तृत खड्डा तयार होतो. या क्रियेत अतिसूक्ष्म वाळू खूप लांबपर्यंत उडत जाते, मात्र जाडीभरडी, थोडया मोठया आकाराची वाळू मागे शिल्लक राहते. अशा सखलीकरणामुळे ‘अपवहन खळगे’ (डिफ्लेशन हॉलोज) तयार होतात

सामान्यपणे वाळवंटात झिरपलेल्या भूमिगत पाण्याच्या पातळीपर्यंत सखलीकरणाचे असे कार्य सतत चालू असते. झिरपलेल्या भूमिगत पाण्यामुळे कालांतराने या खळग्यात पाणी साचून तिथे पाणथळ प्रदेश तयार होतात. यांनाच ‘मरुवन’ म्हणतात. वाळवंटांत वर्षानुवर्षे एकाच दिशेने वारे वाहत असल्याचा मरुवनांची निर्मिती हा अटळ परिणाम असतो. काही वाळवंटांत तर अशी मरुवने  समुद्र सपाटीच्याही खालीपर्यंत खोल होत गेलेली दिसतात! अर्थात असे असले तरी सगळ्याच वाळवंटात मरुवने तयार होतात असेही नाही.

वाळवंटातील ही सरोवरे आजूबाजूच्या भागांतले गोडे पाणी भूमिगत होऊन त्यापासून तयार होतात. वाळवंटातील नैसर्गिक झरे हा त्यातील पाण्याचा मुख्य स्रोत असतो. यातून येणारे पाणी काही वेळा इतके जास्त असते कि सरोवर पाण्याने पूर्ण भरून जाते. काही ठिकाणी वाळूच्या आवरणाखाली असलेल्या जलधारी खडकातून पाणी वर येऊनही ही सरोवरे बनतात. सीरिया, अॅरिझोना, इजिप्त, सौदी अरेबिया, लिबिया, ट्युनिशिया, चीन, ब्राझील, इस्राएल आणि पेरू या आणि अशा असंख्य लहान मोठ्या वाळवंटात सरोवर निर्मितीचा हा विलक्षण सुंदर आविष्कार पहायला मिळतो.

या सरोवरांच्या किंवा मरुवनांच्या सर्व बाजूंनी स्थानिक लोक खजुरासारखी वाळवंटात होणारी झाडे लावतात. त्यामुळे तिथे उडत येणाऱ्या वाळूपासून सरोवराचे रक्षण होते. पाम वृक्षासारखी, खोलवर मुळे जाणारी आणि पाणी धरून ठेवणारी झाडेही सरोवरातील पाणी टिकवून ठेवतात.

सहारा वाळवंटातील ९० टक्के मरुवन सरोवरांना भूमिगत झऱ्यातूनच पाणी मिळते. सहारा वाळवंटातून उत्खनन केलेली प्राचीन आदिम शैलचित्रे आणि जीवाश्म असे सूचित करतात की सहारा वाळवंट हे एकेकाळी तुलनेने थोडे जास्त हिरवट असे विस्तीर्ण मरुवनच होते आणि ते मानवी वसाहती, वनस्पती आणि प्राण्यांनी समृद्ध होते.

डॉ. श्रीकांत कार्लेकर