०७-०८-२०२५ | हिमनद्यांमधील घातक सूक्ष्मजीव!

हिमनद्या (ग्लेशियर्स) म्हणजे अतिशीत तापमानामुळे पाणी गोठून अनेक वर्षे साठलेला बर्फ.  हिमनद्या ही विशिष्ट सूक्ष्मजीवांची परमसीमा परिसंस्था आहे. हे सूक्ष्मजीव बर्फाच्या पृष्ठभागावर, आत आणि खोलवरदेखील वाढू शकतात. हिमनद्यांमधील सूक्ष्मजीवांचे वैशिष्ट्य म्हणजे ते अतिकमी तापमान, नीलकिरणांचा मारा आणि अल्प प्रमाणात असणारी पोषकद्रव्ये; अशा प्रतिकूल परिस्थितीतही बर्फात सुप्तावस्थेत राहून जिवंत असतात. हे सूक्ष्मजीव हिमनदीच्या परिसंस्थेसाठी महत्वाचे घटक असतात.

हवामान बदलांमुळे वाढलेल्या तापमानाचा परिणाम हिमनद्यांच्या वितळण्यात होत आहे. हिमनद्यांच्या वितळलेल्या बर्फाच्या विश्लेषणात प्रथिने आढळून आल्याने त्यांच्यात सजीवांचे विशेषतः सूक्ष्मजीवांचे अस्तित्व आहे, हे लक्षात आले. वितळलेल्या हिमनद्या भूतकाळातील हवामान,पर्यावरण व त्यातील सजीव यांच्या माहितीचा उत्तम स्त्रोत असून त्या प्राचीन हवामान व त्यात झालेले बदल यांचा अभ्यास व भविष्यातील बदलांच्या अंदाजासाठी उपयुक्त आहेत. हिमनद्यांमधील बर्फात सुमारे १५,००० वर्षे जुन्या सूक्ष्मजीवांची नोंद करण्यात आली आहे.

यात अनेक नवीन सूक्ष्मजीवांचा शोध लागला आहे. त्यामध्ये जीवाणू (बॅक्टेरिया), विषाणू (व्हायरस), शैवाल (अल्गी), बुरशी (फंगस) आणि अतिसूक्ष्म आदिजीवाणू (आर्किया) इत्यादींचा समावेश आहे. संशोधनात असे आढळून आले आहे की, यातील ९८ टक्के सूक्ष्मजीव नवीन जाती व प्रजातीचे आहेत. सर्वसाधारणपणे जंथिनोबॅक्टेरियम, पोलॅरोमोनास, स्फिंगोमोनास, फ्लेवोबॅक्टेरियम आणि मिथाईलोबॅक्टेरियम या वंशातील सूक्ष्मजीव हिमनद्यांमध्ये आढळून येतात. सायक्रोफाईल्स गटातील सायक्रोबॅक्टर, मोरॅक्झेला आणि स्युडोअल्टेरोमोनास हे जीवाणू शून्यापेक्षा कमी तापमानातही सक्रिय असलेले आढळून आले आहेत. जीवाणूंच्या २७,००० नवीन प्रजाती घातक असण्याची शक्यता वर्तवली आहे. बर्फामध्ये सुप्तावस्थेत असलेले दहा हजारांहून अधिक वर्षांचे जुने जीवाणू वितळलेल्या हिमनद्यांमध्ये सक्रिय झालेले दिसून आले आहेत. एखादा पदार्थ नैसर्गिकरित्या सजीवांमध्ये आढळत नाही, पण तो बाहेरून सजीवांमध्ये प्रवेश करतो, त्याला झेनोबायोटिक म्हणतात. अशा स्वरूपाचे सूक्ष्मजीवही वितळलेल्या हिमनद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात.

हिमनद्यांमधील सूक्ष्मजीव बर्फातील जैव-भू-रासायनिकचक्राचा विशेषतः गंधकाच्या चक्राचा एक महत्त्वाचा भाग असून ते पोषकद्रव्ये आणि इतर घटकांसाठी उपयुक्त ठरले आहेत. वितळलेल्या बर्फाबरोबर वहात आलेले काही नवीन जीवाणू व विषाणू सक्रिय होऊन त्यांच्यामुळे नवीन आजार उद्भवू शकतात, तसेच दुर्मिळ आजारांवर उपाय देखील सापडू शकतात, त्यामुळे हिमनद्यांमधील जीवाणूंवर मोठ्या प्रमाणावर जगभर संशोधन होत आहे. काही जीवाणू वितळलेल्या हिमनद्यांमध्ये फारकाळ जिवंत राहू शकत नाहीत; पण त्यांची घातक गुणसुत्रे इतर जीवाणूंमध्ये प्रवेश करून आरोग्याला घातक असलेल्या जीवाणूंची निर्मिती मात्र नक्की होऊ शकते!

अनघा शिराळकर