आधुनिक माणूस तसा तुलनेने अलिकडचाच म्हणजे ३०-५० लाख वर्षापूर्वीचा आहे. ‘टर्शरी’ कालखंड म्हणजे ६ कोटी ५० लाख वर्षांपूर्वीचा. १८ कोटी ५० लाख वर्षांपूर्वी अस्तित्वात होता तो ‘मेसोझोईक’ कालखंड. या कालखंडात सरपटणार्या प्राण्यांचे राज्य प्रामुख्याने अस्तित्वात होते. त्याच्याही पूर्वीचा कालखंड म्हणजे ‘पेलेओझोईक’ कालखंड. हा कालखंड ३२ कोटी वर्षांपूर्वीचा मनाला जातो.
एल्सो स्टेरेनबर्ग बरघूर्न आणि जेम्स विलियम शॉफ यांनी हॉरवर्ड विद्यापीठात १९६० साली ‘पेलेओझोईक’ कालखंडाच्याही आधी ‘प्रीकॅम्ब्रियन’ कालखंडातील काही जीवाश्म पुरावे मिळतात का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, पृथ्वीवर कार्बनडायऑक्साइडयुक्त वातावरणात बदल घडून ते प्राणवायूयुक्त होत होते. अशा बदलाच्या काळात त्यांना अतिशय प्राथमिक अवस्थेतील जीवनिर्मितीला लागणार्या रसायनांची संरचना घडत असतांनाचे पुरावे मिळाले. ऑस्ट्रेलिया येथील बिटर स्प्रिंग या झर्याच्या चिखलात त्यांना सूक्ष्मजीवांच्या ३० जातींचे सूक्ष्म जीवाश्म आढळून आले. त्यात तर काही बुरशी आणि ब्ल्यु ग्रीन अल्गी यांचे जीवाश्म ९० कोटी वर्षे जुने असल्याचे आढळून आले आहे. अतिपुरातन जीवश्मांचे नमुने मिळाल्यावर तर या संशोधनाला चांगलीच गती प्राप्त झाली.
कॅनडा येथील ऑटॅरिओच्या ‘लेक सुपीरियर’च्या किनार्यावर गनफ्लिट लोह रूपातील सूक्ष्मजीवाश्म तयार झाल्याचे पुरावे १.८ ते २.१ अब्ज वर्ष पुरातन असल्याचे सिद्ध झाले. भारतातील कर्नाटक प्रांतात धारवाडातील संदूर जिल्ह्यात २ अब्ज वर्षापूर्वीच्या सूक्ष्म जीवश्मांचे उत्खनन करण्यात आले. ऑस्ट्रेलियात स्ट्रोमॅटोलिथिक लाईमस्टोन मध्ये जवळ जवळ २.८ अब्ज वर्षापूर्वीचे सूक्ष्म जीवाश्म सापडले. यालाच ‘चेर्ट्स ऑफ लाईमस्टोन ऑफ स्ट्रोमॅटोलिथिक फ्रॉटेस्क्यू फॉसिल ऑफ ऑस्ट्रेलिया’ असे म्हणतात. पश्चिम ऑस्ट्रेलियात पश्चिम वारावुना खडकांच्या समूहात जगातील सर्वात जुने सूक्ष्म जीवाश्म आढळून आले आहेत. ते तर ३.५ अब्ज वर्षे पुरातन असल्याचे सिद्ध झाले आहे.
म्हणजे सजीवाचे अस्तित्व सध्याच्या संशोधनानुसार तरी ३.५ अब्ज वर्षे पुरातन आहे. यावरून अतिपुरातन सजीवाचे अस्तित्व सूक्ष्मजीवांच्या स्वरुपात असण्याची शक्यता वर्तवता येते. हे अत्यंत साध्या स्वरुपातील सूक्ष्मजीव आपले पूर्वज होते असे म्हणायला हरकत नाही. पृथ्वी ही ४.५ अब्ज वर्षांपूर्वी अस्तित्वात आली असे मानले जाते. जर ३.५ अब्ज वर्षेपुरातन जीवाश्म शोधले गेले असतील तर पृथ्वीवर जीवनदायी सेंद्रिय पदार्थांच्या निर्मितीला साधारण १ ते १.५ अब्ज वर्षे लागली असावीत, असा अंदाज वर्तवला जातो.
डॉ. रंजन गर्गे