राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा (२०२५)

प्रतिवर्षीप्रमाणे ‘मराठी विज्ञान परिषदे’तर्फे ‘राज्यस्तरीय विज्ञान एकांकिका स्पर्धा – २०२५’ आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेचे हे अकरावे वर्ष असून, स्पर्धेला प्रतिवर्षी उत्तम प्रतिसाद मिळत आहे, हे नमूद करताना आनंद होत आहे. शैक्षणिक आणि खुला अशा दोन गटांत होणाऱ्या ह्या स्पर्धेसाठी विज्ञान – तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील कोणत्याही विषयावर आधारलेली एकांकिका सादर करता येते.

एकांकिकेमध्ये ‘वैज्ञानिक आणि शोध’ (कथानकामध्ये) वैज्ञानिकाने केलेले संशोधन व त्यामध्ये त्यांना आलेल्या अडचणी यावर विशेष भर असावा, ‘विज्ञानकथा’, ‘वैज्ञानिक दृष्टीकोन’, विज्ञान संकल्पना असे विषय ह्या विज्ञान एकांकिका स्पर्धेत हाताळले जाऊ शकतात. अंधश्रद्धा, पर्यावरण, सण आणि त्यामागील विज्ञान हे विषय या स्पर्धेतून वगळले आहेत. स्पर्धा प्राथमिक व अंतिम अशा दोन फेऱ्यात होईल.

शैक्षणिक गट : इयत्ता सातवी ते बारावीचे विद्यार्थी,
खुला गट : वरिष्ठ महाविद्यालय (वयाची अट नाही) आणि प्रायोगिक / हौशी नाट्यसंस्था

प्राथमिक फेरी – प्रवेशिका पाठवण्यासाठीच्या सूचना :

  • खाली दिलेल्या संकेतस्थळावर स्पर्धेची सविस्तर माहिती उपलब्ध आहे. स्पर्धेचे शुल्क रु. ५००/- ऑनलाइन पद्धतीने भरावयाचे आहे. www.mavipa.org
  • ऑनलाईन प्रवेशशुल्क ₹ ५००/- भरावे. त्यानंतर प्रवेशिका डाऊनलोड करून घ्यावी. प्रवेशिकामध्ये योग्य माहिती भरून मविपकडे ई-मेलने ekankika@mavipa.org अथवा कुरिअरने पाठवावी.
  • प्रवेशिका मिळण्याचा अंतिम दिनांक – ११ ऑगस्ट २०२५
  • प्राथमिक व अंतिम फेरीचे परीक्षण प्रत्यक्ष सादरीकरणाने होईल. सहभागी संस्थांच्या संख्येनुसार मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक / नागपूर अशा विविध केंद्रांवर प्राथमिक फेरी होईल.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत –

  • प्राथमिक फेरीसाठी सादरीकरण करताना जुजबी नेपथ्य वापरता येईल, मात्र प्रकाशयोजना करता येणार नाही. वेषभूषाही नसावी. नेपथ्य आणि वेषभूषा या कारणाने दोन एकांकिकांदरम्यान वेळही जास्त जातो. तसेच जे स्पर्धक या दोन्ही बाबी नियमाप्रमाणे अंमलात आणतात त्यांच्यावर अन्याय होतो. मात्र नेपथ्य व प्रकाशयोजनेचे आराखडे द्यावे लागतील.
  • प्राथमिक फेरी विभागीय पद्धतीने साधारणपणे ११ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत घेतली जाईल. परीक्षक रंगभूमी आणि  वैज्ञानिक क्षेत्रातील मान्यवर असतील.
  • प्राथमिक फेरीतील सादरीकरणापूर्वी लेखकाची परवानगी / कलाकारांची यादी, एकांकिकेची संहिता यांच्या दोन प्रती देणे आवश्यक आहे. याशिवाय कलाकारांची यादी (लेखक / दिग्दर्शक / नेपथ्य / संगीत / प्रकाशयोजनाकार इत्यादी व व्यासपीठावरील कलाकार यांची नावे असलेली) एक प्रत संयोजकांसाठी स्वतंत्र द्यावी. अंतिम फेरीच्या सादरीकरणापूर्वी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र अथवा त्यासाठी भरलेल्या रकमेची पावती द्यावी लागेल.
  • अंतिम फेरीतील सादरीकरणासाठी स्पर्धक संस्थांना १ तास १० मिनिटांचा कालावधी दिला जाईल. या कालावधीत स्पर्धक संघाने नेपथ्य, प्रकाशयोजना, इतर सर्व तांत्रिक बाबी पूर्ण करणे आणि सादरीकरणानंतर रंगमंच मोकळा करणे अपेक्षित आहे. प्रत्यक्ष एकांकिका सादरीकरणाचा कालावधी कमीत कमी ३० मिनिटे आणि जास्तीत जास्त ४० मिनिटे असेल.
  • प्रत्यक्ष रंगमंचावर एकांकिका सादर करणार्‍या कलाकारांची संख्या २ ते १० विद्यार्थी / व्यक्ती एवढीच असावी.

मुख्याध्यापक / संघप्रमुख / संस्थाप्रमुख यांच्या मान्यतापत्राचा नमुना आणि लेखकाच्या प्रतिज्ञापत्राचा नमुना संकेतस्थळावर दिला आहे.

प्राथमिक फेरीतील विभागांनुसार प्रत्येक विभागातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन क्रमांक जाहीर केले जातील. विभागात आलेल्या गटानुसारच्या प्रवेशिकांची संख्या कमी असेल, तर तिन्ही पारितोषिके (प्राथमिक फेरीसाठी) देण्याचा वा कमी करण्याचा निर्णय मराठी विज्ञान परिषदेचा असेल. प्रत्येक विभागातून पहिल्या क्रमांकाची एकांकिका अंतिम फेरीसाठी पात्र असेल. तथापि, परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. याचबरोबर एकांकिकेचा दर्जा व प्राथमिक फेरीतील स्पर्धक संस्थांची संख्या लक्षात घेऊन परीक्षक एका गटातून / एखाद्या केंद्रातून एकापेक्षा अधिक एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडू शकतात.

अंतिम फेरी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात (दि. ३ ते ७) मुंबईत प्रत्यक्ष रंगमंचावरील सादरीकरणाद्वारे होईल. त्या संबंधीची नियमावली अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या संस्थांना त्वरित कळवली जाईल. अंतिम फेरीतील सादरीकरणापूर्वी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र अथवा सदर प्रमाणपत्रासाठी पैसे भरल्याची पावती देणे / सादर करणे आवश्यक आहे.

अंतिम फेरीतील पारितोषिकप्राप्त एकांकिका मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, यूट्यूबवर, तसेच फेसबुक पेजवर प्रसारित केल्या जातील, याची नोंद लेखक आणि स्पर्धक संस्थांनी घ्यावयाची आहे. अंतिम फेरीचे प्रत्यक्ष चित्रीकरण केले जाऊन प्रयोग चालू असताना मराठी विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावर, यूट्यूबवर, तसेच फेसबुकवर त्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

प्राथमिक व अंतिम फेरीत सादरीकरणात सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांना, कलाकारांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल.

स्पर्धा संयोजक : श्री. रवींद्र ढवळे ९९२०५७२९७४, स्पर्धा समन्वयक – श्रीमती सुचेता भिडे ९२७१५०१३६३

कार्यवाह : श्री. दिलीप हेर्लेकर / श्री. अ.पां. देशपांडे / प्रा. भालचंद्र भणगे

प्राथमिक फेरीसाठीची पारितोषिके प्रत्येक विभागासाठी आणि गटासाठी
प्रथम क्रमांक : ₹ ३,०००/-, द्वितीय क्रमांक : ₹ २,०००/-, तृतीय क्रमांक : ₹ १,०००/-

अंतिम फेरी सांघिक पारितोषिके :
प्रथम क्रमांक : ₹ ३१,०००/-, द्वितीय क्रमांक, ₹ २१,०००/-, तृतीय क्रमांक : ₹ ११,०००/-
पहिल्या तिन्ही संघांना मराठी विज्ञान परिषदेचे स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येईल.

वैयक्तिक पारितोषिके :
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी ₹ ५०००/-, सर्वोत्कृष्ट अभिनेता ₹ ३,०००/-,
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ₹ ३,०००/-, सर्वोत्कृष्ट नेपथ्य ₹ ३,०००/-,
सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना ₹ ३,०००/-, सर्वोत्कृष्ट संगीत ₹ ३,०००/-,
सर्वोत्कृष्ट लेखन ₹ ४,०००/-

लेखनाचे पारितोषिक या वर्षीच्या स्पर्धेसाठीच लिहिलेल्या एकांकिकेला दिले जाईल.

कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, ‘विज्ञान भवन’, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी क्र. ०२२ ४८२६ ३७५०/ ४८२६ ००९४,
इ-मेल : ekankika@mavipa.org संकेतस्थळ : www.mavipa.org

माहितीकरिता नमुना म्हणून काही पुस्तकांची नावे आणि संकेतस्थळे खाली देत आहोत –

१. विज्ञानयात्री डॉ. अनिल काकोडकर : अ.पां. देशपांडे व श्रीराम मनोहर, राजहंस प्रकाशन
२. विज्ञानयात्री डॉ. माधव चितळे : अ.पां. देशपांडे, राजहंस प्रकाशन
३. विज्ञानयात्री डॉ. माधव गाडगीळ : अ.पां. देशपांडे, राजहंस प्रकाशन
४. विज्ञानयात्री डॉ. वसंत गोवारीकर : अ.पां. देशपांडे, राजहंस प्रकाशन
५. डॉ. माशेलकर बौद्धिक संपदेचा उद्गाता : अ.पां. देशपांडे, ग्रंथाली
६. अज्ञात आइन्स्टाइन : बाळ फोंडके (अनुवाद : सुहासिनी अग्निहोत्री), मनोविकास प्रकाशन
७. अग्निपंख : ए. पी. जे. अब्दुल कलाम (अनुवाद : माधुरी शानभाग), राजहंस, प्रकाशन
८. कणाद ते कलाम : रंजन गर्गे, परममित्र प्रकाशन,
९. मारी क्‍यूरी : अश्विनी भिडे-देशपांडे, ग्रंथाली
१०. भारतीय गणिती : ना.ह. फडके, वरदा प्रकाशन,
११. नोबेल-विज्ञानवती : चित्रा नित्सुरे, नवचैतन्य प्रकाशन
१२. गणकचक्र चूडामणि भास्कर : मोहन आपटे, राजहंस प्रकाशन
१३. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ आणि संशोधक : भालबा केळकर, डायमंड प्रकाशन
१४. लीझ माईट्नर : वीणा गवाणकर, राजहंस प्रकाशन
१५. भारतीय शास्त्रज्ञ : डॉ. सी. व्ही. रामन : डॉ. प्रभाकर कुंटे, पॉप्युलर प्रकाशन
१६. रामानुजन जीनियस गणितज्ञ : डॉ. द.व्यं. जहागीरदार, राजहंस प्रकाशन
१७. होमी भाभा : चिंतामणी देशमुख, ग्रंथाली
१८. जगदीशचंद्र बसू : दिलीप कुलकर्णी, राजहंस प्रकाशन
१९. http://arvindguptatoys.com/arvindgupta/bs-marathi.pdf
२०. http://arvindguptatoys.com/arvindgupta/mar-kaprekar.pdf

विज्ञानकथा संग्रह
१. अंतराळातील भस्मासूर – डॉ. जयंत नारळीकर, श्रीविद्या प्रकाशन,
२. व्हायरस – डॉ. जयंत नारळीकर
३. सॅप – माधुरी शानभाग, नवचैतन्य प्रकाशन,
४. गुडबाय अर्थ – डॉ. बाळ फोंडके, मेहता पब्लिशिंग हाउस
५. कालवलय – डॉ. बाळ फोंडके, मेहता पब्लिशिंग हाउस,
६. प्रेमाचा रेणू – डॉ. संजय ढोले, मेहता पब्लिशिंग हाउस
७. दुसरा कोलंबस – डॉ. द.व्यं. जहागीरदार, साहित्यसेवा प्रकाशन
८. वामनाचे चौथे पाऊल – सुबोध जावडेकर, मेहता पब्लिशिंग हाउस
९. दुसरा आइन्स्टाइन – श्री. लक्ष्मण लोंढे,
१०. प्रारंभ – डॉ. मेघश्री दळवी, सृजनरंग पब्लिकेशन
११. कल्पित-अकल्पित – श्रीमती सुधा रिसबूड, मेहता पब्लिशिंग हाऊस

प्रवेशिका डाऊनलोडसाठी येथे क्लिक करा.

संपूर्ण माहितीपत्रक डाऊलोडसाठी येथे क्लिक करा