लोकसंख्येत होणारी अफाट वाढ आणि त्याच वेळी वेगाने घटणारे गोड्या पाण्याचे स्रोत या परिस्थितीमुळे लोक आता भूजलाकडे वळले आहेत. भूजलाचा वापर करताना नियोजनाचा पूर्ण अभाव दिसून येत आहे, आणि उपसा मात्र प्रचंड वाढत आहे. त्यातून पाण्याच्या समस्येत भरच पडत आहे. यातून वैज्ञानिक संशोधनाच्या आधारे जलसंसाधनांचे संवर्धन करण्याचे आह्वान समाजासमोर ठाकले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागातल्या सात ध्येयवादी प्राध्यापकांनी ते स्वीकारले, आणि १९९८ मधे अॅक्वाडॅम या गैरशासकीय संस्थेची (नॉन गवर्नमेंट ऑर्गनाइजेशन) पुण्यामधे स्थापना केली.
‘अॅक्वाडॅम’ संस्थेचे पूर्ण नाव आहे ‘अॅड्व्हान्स्ड सेंटर ऑफ वॉटर रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट’; म्हणजेच ‘जलसंसाधने विकास आणि व्यवस्थापनविषयक प्रगत केंद्र’. जलसंसाधनांचा विकास आणि नियोजन यांवर मूलभूत आणि प्रगत संशोधन करणे हे या संस्थेचे पहिले उद्दिष्ट आहे; तर लोकसहभागातून जलस्रोतांचे पुनर्भरण, विकास आणि व्यवस्थापन करणे हे दुसरे उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने अॅक्वाडॅमने गेली पंचवीस वर्षे ठिकठिकाणच्या ग्रामस्थांना जलस्रोतांचे पुनर्भरण, विकास आणि व्यवस्थापन यांच्याविषयी शिक्षण दिले आहे.
संस्था नेपाळसह हिमालयाच्या क्षेत्रात झऱ्यातून मिळणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. भारतातली लडाख, बिहार आणि झारखंड ही राज्ये; हिमालय आणि सह्याद्रीतली अतिदुर्गम क्षेत्रे; नेपाळ, भूतान हे शेजारी देश; आणि पश्चिम आफ्रिकेतले काही देश इथल्या पाण्याविषयीच्या विविध प्रकल्पांमधे संस्थेने मोठे योगदान दिले आहे.
नजीकच्या भविष्यकाळासाठी कार्यविस्ताराचे जे नियोजन आहे त्यात शहरी भागांच्या जलसंसाधनाच्या व्यवस्थापनावरही लक्ष केंद्रित करायचे अॅक्वाडॅमने ठरवले आहे. शहरी भागात पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचे प्रमाण अलीकडे वाढत आहे. त्या बाबतीत परिपूर्ण अभ्यास करावा आणि काही उपाय योजना सुचवता येतील का ते पहावे, असा संस्थेचा मानस आहे.
सामाजिक जाणीवेतून केलेल्या गोड्या पाण्याच्या पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयावर संस्थेने केलेल्या कामासाठी अॅक्वाडॅमला अनेक देशीविदेशी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. २०२३मधे केंद्र शासनाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने अॅक्वाडॅमला अधिकृत वैज्ञानिक संस्था म्हणून मान्यता दिली आहे. तर अॅक्वाडॅमला २०२४ चा आंतरराष्ट्रीय जलपुरस्कारही जाहीर झाला आहे.
अॅक्वाडॅमसारख्या काही संस्थांनी आपल्या कामातून असे दाखवून दिले आहे, की जर स्थानिक लोकांचा सहभाग असेल, तर संपूर्ण जगाला भेडसावणारी पाण्याची समस्या दूर करण्याच्या कामात यश मिळते. उद्याच्या पिढीसाठी हा कित्ता ठिकठिकाणी गिरवला मात्र गेला पाहिजे.
डॉ. शिल्पा शरद पाटील