कद्रीय भूमिजल मंडळ या संस्थेचा मुख्य उद्देश भूजल संसाधनांचा शाश्वत विकास व व्यवस्थापन हा आहे. या संस्थेचे मुख्यालय फरीदाबाद, हरियाणा येथे आहे. संस्थेची स्थापना १९७० मध्ये झाली. सुरुवातीच्या काळात संस्थेचे नाव ‘एक्सप्लोरेटरी ट्यूब वेल्स ऑर्गनायझेशन’ असे होते. ही संस्था सुरुवातीला कृषी मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करत होती. १९७२ मध्ये केंद्रीय भूमिजल मंडळ ही संस्था भारतीय भूसर्वेक्षण संस्थेत (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) समाविष्ट झाली आणि त्यानंतर १९८२ पासून ती जलसंपदा आणि नदी विकास मंत्रालयाच्या अधीनस्थ विभाग आहे.
१९९७ पासून भूजल विकास आणि व्यवस्थापनाचे नियमन या संस्थेद्वारे सुरू झाले. भूजल संसाधनांचे अन्वेषण, मूल्यांकन, संवर्धन, संरक्षण आणि वितरण या सर्व कार्यांसाठी तसेच आर्थिक व पर्यावरणीय कार्यक्षमता व समतोल साधण्यासाठी केंद्रीय भूमिजल मंडळ कार्य करत आहे. भारतात उपलब्ध असलेल्या भूजल या संसाधनाचा योग्य वापर व उपयोग करण्यासाठी केंद्रीय भूमिजल मंडळ प्रयत्न करत आहे. केंद्रीय भूमिजल मंडळाच्या प्रमुख उपक्रमात जलधर नकाशे (अक्विफर मॅपिंग), जलधरांचे पुनर्भरण, भूभौतिकीय अन्वेषण, भूजल गुणवत्ता तपासणी यांचा समावेश होतो. ही कार्ये करण्यासाठी केंद्रीय भूमिजल मंडळाने भारत भूजल संसाधन आकलन प्रणाली, सूचना आणि प्रबंधन प्रणाली तसेच नागरिक पोर्टल, जलसंसाधन माहिती इत्यादी सुविधा संकेतस्थळाच्या माध्यमातून उपलब्ध केल्या आहेत.
अलिकडच्या काळात भारतातील गतिशील भूजल संसाधनांचे राष्ट्रीय माहिती संकलन हा उपक्रम केंद्रीय भूमी जलमंडळाद्वारे राबवण्यात आला. केंद्रीय भूमी जल मंडळ चार केंद्रांद्वारे काम करते; संशोधनात्मक खनिकर्म आणि सामग्री व्यवस्थापन (एक्स्प्लोरेटरी ड्रिलिंग आणि मटेरीअल मॅनेजमेंट), शाश्वत व्यवस्थापन व संपर्क सर्वेक्षण, मूल्यांकन, देखरेख व प्रशिक्षण आणि तंत्रज्ञान हस्तांतरण. ह्या प्रत्येक विभागाचे प्रतिनिधित्व एक सदस्य करतात. देशातील भूजल विकास नियमनाशी संबंधित विविध उपक्रमांवर देखरेख केली जाते.
भूजल संपत्तीच्या नियोजन आणि व्यवस्थापनाबाबत राज्य आणि वापरकर्त्या संस्थांना सल्ला देण्याबरोबरच केंद्रीय भूमिजल मंडळ वैज्ञानिक भूजल शोध, विकास व व्यवस्थापन यासाठीही कार्य करते. केंद्रीय भूमिजल मंडळाद्वारे नागरी व ग्रामीण भागात विविध पद्धतीने भूजल पुनर्भरण करण्यास प्रोत्साहन दिले जाते. राष्ट्रीय पातळीवर भूजल विकास धोरणावर काम व अंमलबजावणी करणारी केंद्रीय भूमिजल मंडळ ही संस्था आपल्या कार्यपद्धतीत अधिकाधिक सुधारणा करताना दिसत आहे. राष्ट्रीय पातळीवर भूजल संसाधनांचा शाश्वत विकास व व्यवस्थापन करण्यात केंद्रीय भूमिजल मंडळाचा मोलाचा वाटा आहे.
ऋजुता पाटील