किरणोत्सर्गी खनिजांच्या खाणकामापासून ते अणुभट्टीमधे विद्युतऊर्जा निर्मितीपर्यंतच्या प्रक्रियेत खनिजांचे उत्पादन, त्यांच्यावरचे संस्करण, त्यांचे कच्च्या इंधनात रूपांतर, अंतिम इंधनात रूपांतर, आणि ऊर्जानिर्मिती अशा विविध टप्प्यांचा समावेश असतो. यातल्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारचा आण्विक (किरणोत्सर्गी) कचरा निर्माण होत असतो.
आण्विक कचरा घन, द्रव किंवा वायुरूप अशा कोणत्याही अवस्थेत असू शकतो. आण्विक कचऱ्याचे वर्गीकरण त्यातल्या किरणोत्सर्गी पदार्थांचे प्रमाण, किरणोत्सर्जनाची तीव्रता आणि त्यांचे ‘अर्धे-आयुष्य’ किती आहे या निकषांवर करण्यात येते. कचरा सामान्यतः निम्नस्तरीय, मध्यमस्तरीय आणि उच्चस्तरीय अशा तीन प्रकारात विभागला जातो. उच्चस्तरीय कचरा सर्वात धोकादायक आणि दीर्घकाळ टिकून रहाणारा असतो; तर निम्नस्तरीय कचरा कमी धोकादायक असतो.
निम्नस्तरीय आणि मध्यमस्तरीय कचरा एकूण कचऱ्याच्या ९७% असतो. पण त्याचे किरणोत्सर्जनाचे प्रमाण केवळ ५% असते. याउलट उच्चस्तरीय कचरा एकूण कचऱ्याच्या ३% असतो; परंतु त्याच्यात किरणोत्सर्जन ९५% असते. कारण त्यात अणुभट्टीत वापरले गेलेले अणुइंधन आणि त्याच्या विखंडनापासून उत्पादित पदार्थ असतात.
निम्नस्तरीय कचऱ्यात कागद, चिंध्या आणि इतर साधने असतात. त्यांच्या किरणोत्सर्जनाची तीव्रता माफक असल्याने, तो कचरा जमिनीवरील सुविधांमध्ये योग्य ती काळजी घेऊन जाळतात. मध्यमस्तरीय कचऱ्यात सामान्यतः रेझिन आणि रासायनिक प्रक्रियांद्वारा निर्माण झालेले पदार्थ, धातूंची उपकरणे, इंधनावरचे आवरण इ. दूषित पदार्थ असतात. त्याचे किरणोत्सर्जन काहीसे अधिक प्रमाणात आणि दीर्घकाळ टिकणारे असते. अशा कचऱ्याला कॉँक्रीट किंवा बिटूमेन नावाच्या रसायनात एकजीव करून आणि घनरूप देऊन जमिनीखाली दहा मीटर किंवा थोड्या अधिक खोलीवर गाडतात.
उच्चस्तरीय कचरा अत्यंत किरणोत्सर्गी आणि उष्ण असतो. त्याचा घातकपणा लाखो वर्षे टिकू शकतो. त्याची काळजीपूर्वक विल्हेवाट कशी लावावी यावर जागतिक स्तरावर अनेक उपायांवर विचार विनिमय चालू आहे. अशा कचऱ्याचे काचीकरण (व्हिट्रिफिकेशन) करुन भूगर्भात २०० मीटरपेक्षा अधिक खोल गाडून टाकणे हा सर्वात महत्वाचा उपाय मानला जातो. तो तिथे लाखो वर्षे स्थिर राहील अशी जागा शोधावी लागते. भूविज्ञानाच्या दृष्टीने लक्षावधी वर्षांपासून भूकंप किंवा ज्वालामुखी यांपासून ती जागा मुक्त आहे, याची खात्री करून घ्यावी लागते. तिथे पडणारा यांत्रिक किंवा औष्णिक ताण सहन करण्याची क्षमता तिथल्या खडकांमधे असली पाहिजे. तिथली भूरासायनिक परिस्थितीही अनुकूल असणे आणि भूजलाचे प्रवाह कमीतकमी असणे आवश्यक असते. तिथे ग्रॅनाइट, बेसाल्ट, चिकणमाती असे किरणोत्सर्गी पदार्थाची गळती न होऊ देणारे आणि किरणोत्सर्जनाला आडकाठी करणारे खडक असावेत, हे पहावे लागते.
अरविंद आवटी