भूपृष्ठाखाली अथवा डोंगरात निसर्गतः निर्माण झालेल्या पोकळ्यांना आपण गुहा म्हणतो. अंधार, रानटी श्वापदांचे वास्तव्य आणि दुर्गम ठिकाणी असणारे अस्तित्व, या बाबींमुळे गुहा रहस्यमयही वाटतात, आणि स्वारस्यपूर्णही वाटतात. काही गुहा मानवनिर्मितही असतात. गुहांचा सर्वंकष वैज्ञानिक अभ्यास करणाऱ्या विज्ञानशाखेला गुहाविज्ञान (स्पीलिऑलॉजी) म्हणतात. भूविज्ञान, जीवविज्ञान, जलविज्ञान, पुरातत्त्वविज्ञान आणि पर्यावरणविज्ञान अशा अनेक शाखांशी संबंधित ती एक बहुआयामी विज्ञानशाखा आहे.
प्राण्यांनी प्राचीन काळापासून गुहांचा आश्रय घेतला आहे. आदिमानवानेही गुहांचा वापर आश्रयस्थान म्हणून केला. चित्रकला आणि शिल्पकला यांचा विकास तसेच अध्यात्माच्या अभ्यासाठीही त्याने गुहांचा वापर केला. त्यामुळे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत गुहांना विशेष स्थान आहे. आपल्या पूर्वजांनी साकार केलेली चित्रकला आणि शिल्पकला आज हजारो पर्यटकांना आकर्षित करत आहे.
गुहांचा आकार लहान बोगद्यांपासून ते विस्तीर्ण आणि गुंतागुंतीच्या भूमिगत प्रणालींपर्यन्त असू शकतो. गुहांचे आकारमान त्या जिथे आढळतात, तिथल्या खडकांवर, आणि त्यांच्यावर पडलेल्या वातावरणीय घटकांच्या परिणामांवर अवलंबून असते.
गुहांचे वेगवेगळ्या प्रकारांमधे वर्गीकरण केले जाते. सर्वात सामान्य प्रकार म्हणजे द्रावण गुहा (सोल्युशन केव्ह्ज). जिथे चुनखडक, जिप्सम किंवा डोलोमाइट यांसारखे काही प्रमाणात पाण्यात विरघळू शकणारे खडक असतात, तिथे द्रावण गुहा निर्माण होतात. पावसाच्या पाण्यात हवेतला कार्बन-डाय-ऑक्साइड अल्प प्रमाणात विरघळतो, त्यामुळे पाण्याचे रूपांतर सौम्य कार्बॉनिक आम्लामधे होते. हे खडक हळूहळू त्यात विरघळतात, आणि भूमिगत पोकळ्या निर्माण होतात. ही प्रक्रिया दीर्घ काळ चालू राहिली, तर काहीशा एकमेकांना जोडलेल्या अनेक गुहा निर्माण होऊन मोठमोठ्या गुहाप्रणाली तयार होतात.
शिलारस गुहा (व्होल्कॅनिक केव्ह्ज) ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान निर्माण होतात . जेव्हां तप्त लाव्हारसाचा बाहेरचा भाग थंड होतो, आणि आतला उष्ण असणारा वहात राहतो, तेव्हां त्याच्या मागे पोकळी तयार होते. लाटांच्या तडाख्यांनी किनाऱ्यालगतच्या मऊ खडकाची झीज होऊन समुद्रगुहा तयार होतात. तर हिमनदीतले वितळणारे पाणी बर्फाच्या तळाशी वाहते तेव्हां तळापासल्या बर्फात पोकळी निर्माण होते, आणि तळाखालच्या पाषाणात पोकळी निर्माण होऊन त्यात बर्फ साठतो. दोन्ही प्रकारच्या गुहांना बर्फाच्या गुहा म्हणतात. पाणी, वारा यांसारख्या घटकांद्वारे खडक झिजल्याने अपरदन गुहा (इरोजनल केव्ह्ज) तयार होतात.
गुहांच्या अभ्यासातून शिलावरणाचा इतिहास, हवामानात झालेले बदल, भूमिगत नद्या, भूपृष्ठाखाली तयार होणारे प्रवाह, गुहांमधले जीववैविध्य, तिथली भित्तिचित्रे आणि शिल्पकला, अशा अनेकविध विषयांबाबतचे ज्ञान मिळते.
अरविंद आवटी