फ्रान्स हा जगातील प्रमुख वाइन उत्पादक आणि निर्यातदार देशांपैकी एक देश आहे. १८६०च्या दशकात अमेरिकन द्राक्षवेलींबरोबर फ्रान्समधील द्राक्षवेली कलम करून नवीन जात विकसित करता येते का, हे पाहण्यासाठी फ्रेंच लोकांनी अमेरिकन द्राक्षवेली मागवल्या. अमेरिकेतून आणलेल्या काही द्राक्षवेलींवर बुरशी आणि रसशोषक कीटक होते. त्यामुळे परदेशी द्राक्षवेलींमुळे युरोपमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रसार झाला व इतिहासात पहिल्यांदा फ्रेंच द्राक्षवेली पावडरी मिल्ड्यू या बुरशीजन्यरोगामुळे बाधित झाल्या. या रोगामुळे वेलींवरील पाने गळली त्यामुळेद्राक्षांच्या गुणवत्तेवर व उत्पादनावर थेट परिणाम झाला. परिणामी फ्रान्समध्ये वाईन उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घटले.
याच कालावधीत, फ्रान्सच्या बोर्डो शहराच्या सीमेलगत असणार्या मेडॉक प्रांतातील द्राक्षउत्पादक शेतकर्यांना द्राक्षचोरांचा त्रास होत होता. द्राक्षचोरी रोखण्यासाठी ते रस्त्याजवळच्या वेलींवर कॉपर सल्फेट आणि चुनखडीचे मिश्रण फवारत होते. हे मिश्रण चवीने कडवट आणि दिसायला निळसर होते. मिश्रण फवारणीमुळे द्राक्षे अनाकर्षक दिसत होती त्यामुळे द्राक्षचोरीला आळा बसत होता. १८८२ मध्ये वनस्पतिशास्त्रज्ञ पिएरे मारी अलेक्सिस मिलार्डे एक दिवस एका द्राक्षबागेतून जात होते. त्यांनी एक विलक्षण निरीक्षण केलं, रस्त्यालगतची द्राक्षवेलीवरील पाने हिरवीगार आणि निरोगी होती, पण आतल्या बाजूच्या सर्व झाडांवर बुरशीचा कहर झाला होता. त्यांनी जाणलं की या विशिष्ट मिश्रणात काहीतरी लपलेलं आहे, जे केवळ चोरांना नाही, तर बुरशीलाही दूर ठेवतंय.
मिलार्डे यांनी रसायनशास्त्राचे प्राध्यापक गेयॉन यांच्या मदतीने प्रयोग केले, शेतांमध्ये चाचण्या घेतल्या आणि लवकरच सिद्ध केलं की,हे निळसर मिश्रण ‘डाऊनी मिल्ड्यू’ सारख्या बुरशीजन्य रोगांवर प्रभावी आहे. या मिश्रणाचा शोध फ्रान्समधील बोर्डो या द्राक्षबागांनी समृद्ध अशा भागात झाला होता, म्हणून या मिश्रणाला नाव मिळालं ‘बोर्डो मिश्रण!’ हे मिश्रण जगातील पहिले बुरशीनाशक ठरले आणि आजही हे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाते. या मिश्रणाचा वापर पिकांवरील अनेक बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य पानांवरील डाग, झाडांची सड, अँथ्रॅक्नोज, डाऊनी मिल्ड्यू आणि कॅंकर नियंत्रणासाठी केला जातो. मिलार्डे यांच्या सन्मानार्थ बोर्डोमध्ये त्यांचा पुतळा उभारण्यात आला व १८८३ ते १९०६ या काळाला ‘मिलार्डेशियन काळ’ म्हणून संबोधले गेले. रस्त्यालगतच्या झाडांकडे पाहून सुचलेल्या एका साध्या प्रश्नातून निर्माण झालेलं बोर्डो मिश्रण आजही शेतीला दिशा देत आहे. शेतकी क्षेत्रातील रासायनिक जंतू आणि कीटकनाशकांचा वापर आज मात्र नकोसा झाला आहे.
डॉ. विनायक पांडुरंग सुतार