दुसऱ्या महायुद्धाची अखेर चालू असतांना ओहसुमी यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९४५ साली फुकुओका या जपानमधील एका गावात झाला. त्यांच्या पत्नीचे नाव मारीको. मुळात रसायनशास्त्रात रस असलेल्या या शास्त्रज्ञाने नंतर रेण्वीय-जीवशास्त्र हा आपल्या संशोधनाचा प्रांत निवडला.
प्रो. ओहसुमी यांचे संशोधन पेशीच्या जीवनचक्राबाबत असून काही पेशी स्वनाश पावतात तर त्यांचे काही भाग दुरुस्तीसाठी पाठविले जातात, याबाबत आहे. याला ‘ऑटोफेजी’ असे म्हणतात. ‘ऑटो’ म्हणजे स्वतः आणि ‘फेजी’ म्हणजे खाणे. ही पेशीच्या स्वभक्षणाची उलगडलेली प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे.यात पेशीच्या पेशीद्रवात नको असलेल्या विविध घटकांचे विशिष्ट पद्धतीने खंडन केले जाते आणि काही प्रथिनांसारख्या पेशीघटकांची पुनर्निर्मिती केली जाते.
प्राणीमात्रांमध्ये विविध प्रकारच्या नव्या पेशी सतत तयार होतात. शरीरात प्रतिसेकंदाला ३० लाख लाल रक्तपेशी तयार होतात आणि त्यासाठी एक लाख अब्ज हिमोग्लोबिनचे रेणू तयार होतात. दर सात वर्षांनी आपला जणू पुनर्जन्म झालेला असतो. कारण शरीरातील आधीच्या पेशींची जागा नव्या पेशींनी घेतलेली असते. मज्जापेशी मात्र अखेरपर्यंत तशाच राहतात. शरीरात २०० प्रकारच्या पेशी विविध इंद्रियांमध्ये कार्यरत असतात. आतड्यातील पेशी चार दिवस, रक्तपेशी चार महिने तर पांढऱ्या पेशी एक वर्ष काम करू शकतात. दररोज शरीरातील पाच ते सात हजार कोटी पेशींचे कार्य संपुष्टात येते.
म्हातारपणात पेशी आत्महत्या का करतात, याचा त्यांनी शोध घेतला. नव्या पेशींना ‘आत्महत्या’ केलेल्या पेशींमधील अनेक प्रथिने आणि रसायने आयती तयार मिळतात. त्यांचा पुनर्वापर होतो आणि उर्जेची बचत होते. त्यांचे म्हणणे असे की, ही प्रक्रिया उत्क्रांतीपासूनची आहे. ‘ऑटोफेजी’ या प्रक्रियेद्वारा शरीराला १७० ग्रॅम प्रथिने आयती मिळतात. डॉ. ओहासुमी यांनी चय आणि अपचय यांच्यातील समन्वय साधण्यासाठी आवश्यक असलेल्या २१ जनुकांचा मागोवा घेतला आहे. या प्रक्रियेत काही बिघाड झाल्यास अनेक रोग होतात. विशेष म्हणजे त्याला कारणीभूत असलेली जनुके त्यांनी शोधली. यातून कर्करोग, पार्किन्सन, कंपवात, मज्जासंस्थेच्या व्याधी, मधुमेह अशा रोगांवर औषधे तयार करता येतील, असा त्यांचा दावा आहे.
टोकियो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथील प्रा. ओहासुमी यांनी २५ वर्षे यावर अविरत संशोधन केले. त्यांच्या या मौलिक कार्यासाठी त्यांना वैद्यकशास्त्रातील २०१६ चे नोबेल पारितोषिक कोणासोबतही न विभागता प्रदान करण्यात आले. नोबेल जिंकल्याचा फोन आला, तेव्हा वयाच्या ७१व्या वर्षीही प्रा. ओहासुमी प्रयोगशाळेच्या कामात व्यग्र होते.
डॉ. रंजन गर्गे