१२-१२-२०२५ | विषाणूची रोगकारक प्रथिन स्फटिके! 

१८८६ साली तंबाखूच्या एका रोगामुळे खूप नासाडी झाली. तंबाखूच्या पानांवर पिवळसर ठिपके पडत होते. त्यामुळे या रोगला जर्मन शस्त्रज्ञांनी ‘मोझाइक’ असे नाव दिले. जर्मन कृषितज्ञ अॅडॉल्फ मेयर यांनी एक साधा प्रयोग करून बघितला. या रोगट पानांचा रस त्यांनी निरोगी पानांत टोचला आणि निरोगी पानांत देखील पिवळे ठिपके दिसू लागले. मग त्यांनी रोगट पानांचा रस ५५ अंश सेल्सियस तापमानला तापवला आणि पुन्हा निरोगी पानांत टोचला. मात्र या वेळी झाड निरोगीच राहिले. त्यांनी या रोगाला जबाबदार रोगजंतूचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु याचे नेमके कारण ते सांगू शकले नाहीत.

१८९२ साली रशियात याच रोगामुळे तंबाखूची खूप नासाडी झाली. दिमित्री इवानोविच यांनी यावर संशोधन करतांना ‘चेंबरलँड गाळणी’तून रोगट पानांचा रस गळून घेतला. या गाळणीची छिद्रे इतकी लहान असतात की यातून जीवाणूदेखील आरपार जाऊ शकत नाही. या गाळणीतून मिळालेला द्रव दिमित्रीनी निरोगी झाडाला टोचला. कालांतराने त्यांच्या लक्षात आले की निरोगी पानांत देखील पिवळे ठिपके दिसताहेत. परंतु सूक्ष्मजीवाचे स्वरूप मात्र अनाकलनीयच राहिले.

पुढे डच संशोधक मार्टिनस बायजेरींक यांनीही हा रोग जीवाणूमुळे होत नसून गाळणीतून पार होऊ शकणार्‍या कुठल्यातरी अतिसूक्ष्म जंतूमुळे होत असावा असे मत मांडले. १९३५ साली अमेरिकन शास्त्रज्ञ वेन्डेल मेरेडिथ स्टॅन्ली (विषाणूशास्त्राचा पितामह) यांनी रोगट पानांच्या रसावर प्रक्रिया करून त्यातील अतिसूक्ष्म घटक स्फटीकांच्या रूपात वेगळे केले. ही स्फटिके निरोगी पानांत टोचली असता रोग उद्भवतो, हे त्यांनी दाखवून दिले. हा शोध क्रांतिकारी ठरला; कारण रोगास कारक सूक्ष्मजीवाचा शोध घेता घेता त्यातील निर्जीव प्रथिन स्फटिकांनी देखील रोग निर्माण होतो हे जगाला प्रथम त्यांनी दाखवून दिले.

त्यानंतर काही काळाने असे सिद्ध झाले की, मोझाइकचा विषाणू (व्हायरस) हा प्रथिन स्फटिकांचा बनलेला असून त्यात रिबोन्यूक्लिक आम्ल म्हणजे आरएनएसुद्धा असल्याचे सिद्ध झाले. या शोधासाठी वेन्डेल स्टॅन्ली यास १९४६ सालचे नोबेल परितोषिक प्रदान करण्यात आले. १९४८ साली कॅलिफोर्निया विद्यापीठात जैवरसायन विभागात त्यांनी विषाणू प्रयोगशाळा सुरू केली. त्यालाच आता ‘स्टॅन्ली हॉल’ म्हणून संबोधले जाते.

विषाणू हे स्वतः प्रजननशील नसतात, परंतु सजीव पेशीत शिरकाव केल्यावर ते प्रजननक्षम होतात. यानंतर मोझाइक संरचनेमुळे आकर्षक दिसणार्‍या अशा अनेक वनस्पती विषाणूजन्य रोगाने बाधित असल्याचे सिद्ध झाले.

डॉ. रंजन गर्गे