मिथेन हा नैसर्गिक वायू आहे. याला मिथाईल हायड्राइड असेही म्हणतात. हा रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील हरितगृहवायू आहे. मिथेन आणि इतर हरितगृह वायू (कार्बन डायऑक्साइड, नायट्रस ऑक्साइड आणि फ्लोरिनयुक्त वायू) वातावरणातील अवरक्त (इन्फ्रारेड) किरणे शोषून घेतात व त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढते. यात मिथेनचा सहभाग २५ टक्के आहे. १७५०पासून सुरू झालेल्या औद्योगिक क्रांतीनंतर वातावरणातील मिथेन वायूचे प्रमाण १६० टक्क्यांनी वाढले आहे. पाण्यातील जीवाणू तसेच विनॉक्सी सूक्ष्मजीव मिथेन तयार करतात. गायी, म्हशी यांसारख्या प्राण्यांच्या पचनक्रियेदरम्यानही मोठ्या प्रमाणात मिथेन वायू तयार होतो.
अनेक कृत्रिम रासायनिक क्रियांद्वारे मिथेन नष्ट करण्याचे प्रयत्न केले जातात. परंतु, मिथेन वायूचे संकलन करून किंवा मिथेन वायू वापरून मिथेनचे वातावरणातील प्रमाण कमी करता येईल. यामुळे पर्यावरणीय आणि आर्थिक फायदेही होतील. या उद्देशाने अर्जेंटिना येथील राष्ट्रीय कृषितंत्रज्ञान संस्थेने गायीच्या पचनक्रियेतून निघणारा मिथेन वायू त्याच गाईच्या पाठीवर एका पिशवीत (बॅकपॅक) संकलित केला जाईल, असे तंत्रज्ञान विकसित केले. या तंत्राने प्रतिदिन ३०० लीटर मिथेनचे संकलन होते. २०३० पर्यंत या तंत्रज्ञानाचा वापर करून मिथेन चे उत्सर्जन २०-३० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
मिथेनचा पोषणासाठी किंवा ऊर्जास्रोत म्हणून उपयोग करणारे मिथेनोट्रोपिक जीवाणू मिथेन वायूचे वातावरणातील प्रमाण कमी करण्यात भाग घेतात. मिथेनोट्रोपिक जीवाणू पाणथळ जमिनीत, जंगलातील दलदलीच्या जागी वाढतात. अशा दलदलीच्या ठिकाणी मिथेन निर्माण करणारे जीवाणूही असतात. मिथेनोट्रोपिक जीवाणू हे प्राणवायू घेऊन किंवा प्राणवायूशिवायही जगू शकतात. (उदा. गॅमा आणि अल्फा प्रोटीओ बॅक्टेरिया, वेरूकोमायक्रोबिया, मेथायलोकोकस कॅप्शूलॅटस, इत्यादी).
पॉलीहायड्रॉक्सीअल्कॅनोएट्स (पीएचए). पॉलीहायड्रॉक्सीब्युटायरेट (पीएचबी) हे मिथेनोट्रोपिक जीवाणू प्लॅस्टिकसदृश नैसर्गिक पॉलीमर बनवू शकतात. हे नैसर्गिक प्लॅस्टिक सहज विघटनशील, जैवसुसंगत आणि जैवपुनर्निर्मितीसाठी योग्य असतात. मिथेनोट्रोपिक जीवाणूंमध्ये खूप विविधता आहे. पाणथळीपासून मिथेनोट्रोपिक जीवाणूचे विलगीकरण करून त्यावर संशोधन केले जात आहे.
सडणार्या सेंद्रिय कचर्यापासून मिथेन निर्माण करून त्यापासून वापरण्यायोग्य ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न पर्यावरण संरक्षण संस्था, ऊर्जा विभाग व राष्ट्रीय अक्षय ऊर्जा प्रयोगशाळा इत्यादी विविध संघटना करीत आहेत.
‘मिथेनवायू संकलन’ही कल्पना जरी चांगली असली तरी, सद्यस्थितीत खर्चिक आहे. मिथेन पचनयंत्राचे कीचकट तंत्रज्ञान आणि मिथेन पचनयंत्रात आवश्यक अशा विशिष्ट कचर्याचा करावा लागणारा अविरत पुरवठा; या अडचणींमुळे मिथेनवायू संकलन ही परीकल्पना आहे की काय, असे वाटते.
डॉ. जयश्री कृष्णा सैनिस