२९-१२-२०२५ | माझा रक्तगट हीच माझी ओळख

माणसाच्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे रक्त. अपघात व शस्त्रक्रिया यामुळे अतिरक्तस्राव होत असतो तेव्हा रक्त संक्रमणाची गरज भासते. यासाठी रक्तगट माहीत असणे गरजेचे असते. रक्तगटाचा शोध लँडस्टेनर यांनी लावला. लँडस्टेनर यांचा जन्म १४ जून १८६८ मध्ये ऑस्ट्रिया मधील हंगेरी येथे झाला. कार्ल यांनी व्हिएन्ना विद्यापीठात वैद्यक शास्त्राचा अभ्यास केला. १८९१ मध्ये त्यांनी डॉक्टरेट साठी प्रबंध लिहिला. त्यावेळी त्यांच्या असे लक्षात आले की जर दोन व्यक्तींच्या रक्ताचे मिश्रण केले तर काहीवेळेस रक्तपेशीच्या गुठळ्या होतात आणि या गुठळ्या होण्यामागील कारण त्यांनी शोधून काढले. त्यांना असे आढळून आले की लाल रक्तपेशीवर दोन प्रकारची प्रथिने ‘ए’ आणि ‘बी’ असतात आणि यांच्या उपस्थितीमुळे हे होते.या प्रथिनांना प्रतिजन म्हणतात, ज्यामुळे रक्तगट ठरतो. या रक्तगट पद्धतीला त्यांनी ‘ए,बी,ओ रक्तगट पद्धत’ असे नाव दिले. कार्ल लँडस्टेनियर यांनी १९०१ साली मानवी रक्ताची चार गटात विभागणी केली असली तरी ती परिपूर्ण नव्हती. १९०४ मध्ये त्यांनी अलेक्झांडर विनर यांच्यासोबत ऱ्हिसस (आरएच) प्रणाली शोधून काढली. ऱ्हिसस माकडांच्या रक्तात आढळणाऱ्या समान प्रथिनांना ‘आरएच’ फॅक्टर असे नाव देण्यात आले. हा अँटीजन्सचा प्रकार असून ज्या व्यक्तीच्या शरीरात हे प्रथिन असते त्या व्यक्ती ‘आरएच’ पॉझिटिव्ह गटात मोडतात आणि ज्यांच्या शरीरात हा घटक नसतो त्यांचा रक्तगट ‘आरएच’ निगेटिव्ह मानला जातो.

ज्यांच्या शरीरात ‘ए’ प्रथीने असतात त्यांचा रक्तगट ‘ए’ असतो तर ज्यांच्या शरीरात ‘बी’ प्रथिने असतात त्यांचा रक्तगट ‘बी’ ठरतो ज्यांच्या तांबड्या पेशींवर या दोन्हीही प्रकारची प्रथिने नसतात त्यांचा रक्तगट ‘ओ’ तर ज्यांच्या पेशीत दोन्ही प्रकारची प्रथिने असतात, त्यांचा रक्तगट ‘एबी’ असतो.

तांबड्या रक्तपेशींच्या पटलावर जवळपास ३० प्रथिने आहेत आणि या ३० प्रथिनांमुळे विविध रक्तगट तयार होतात. रक्त योग्य व्यक्तीस दिले जात आहे की नाही, हे ठरवण्यासाठी रुग्णाचा रक्तरस (सिरम) आणि दात्याचे रक्त एकत्र मिसळून उबवणयंत्रात ठेवले जाते. त्यांचे रक्त गट भिन्न असल्यास त्याच्या गुठळ्या होतात.

त्यांच्या या संशोधनासाठी त्यांना १९३० मध्ये वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. कार्ल लँडस्टेनियर यांच्या या महत्वपूर्ण कार्याचा यथोचित गौरव म्हणून त्यांचा १४ जून हा जन्मदिवस जागतिक ‘रक्तदानदिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

डॉ. रोहिणी कुलकर्णी