३१-१२-२०२५ | सूक्ष्मजीवांच्या अदृश्य सत्तेचे नवे युग

सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वाचा आवाका इतका मोठा की त्यांचे अस्तित्व जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी असे सर्वव्यापी आहे. अवकाशात हजार फूट उंचीवर किरणोत्सारावर जगणारे सूक्ष्मजीव आहेत, तसे समुद्राच्या खोल तळाशी वास्तव्य करणारे सूक्ष्मजीव देखील आहेत. सूक्ष्मजीवांचा शोध लागला आणि शेकडो वर्षे आपण त्यांच्याकडे फक्त शस्त्रूत्वाच्या भावनेनेच बघितले. तो रोगकारक असतो आणि त्याचा नायनाट व्हायला हवा म्हणून जंतूंनाशके आणि प्रतिजैविके शोधून काढण्याकडे संशोधनाचा कल होता. जंतूंच्या महासागरात वावरत असतांना त्याला काही मानवच का बळी पडतात? आणि मग लक्षात आले की रोगप्रतिकारकशक्तीरूपी परवाना प्रत्येकाला जन्मजात मिळालेला असतो. त्याचे नूतनीकरण मात्र आवश्यक आहे. एखादा रोग बरा करण्यासाठी त्याच रोगाचा जंतू आवश्यक असतो असे जेव्हा लस संशोधनात लक्षात आले तेव्हा तर शास्त्रज्ञ रोगजंतूंच्या इतक्या प्रेमात पडले की देवीचे निर्मूलन झाल्यावर जिनेव्हात ‘हे जंतु नष्ट करू नका, कदाचित भविष्यात लसनिर्मितीसाठी लागतील.’ असा ठराव घेण्यात आला.

मानवी शरीराचा प्रत्येक अवयव ही विविध सूक्ष्मजीवांची परिसंस्था असून जन्मल्यापासून तिथे मित्रजंतू वास करत असतात. आपल्या पेशीच्या आत देखील सूक्ष्मजीव सहकार्याने वास्तव्य करत असतात. हाच तो मायक्रोबायोम! मायक्रोबायोमचा लठ्ठपणा, मधुमेह, नैराश्य, अल्झायमर यांसारख्या  आजारांशी असलेले संबंध अभ्यासला जात आहेत. पृथ्वीवरील प्रत्येक जीवनचक्राची सुरुवात सूक्ष्मजीवांपासूनच झालेली असते. म्हणून ‘नेव्हर अंडरएस्टिमेट दि पॉवर ऑफ मायक्रोब्ज.’

या सूक्ष्मजंतूंचा जैवतंत्रज्ञानासाठी वापर सुरू झाल्यापासून शेतकी, उद्योग, वैद्यक, युद्ध, हवामान, पर्यावरण प्रदूषण, परग्रहावरील सृष्टीचा शोध आणि अशा जीवनातील जवळजवळ प्रत्येक  क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडून आले. मित्रजंतूंचे संतुलन राखून प्रोबायोटिक्स सारख्या स्वास्थ्य उपचार पद्धती देखील विकसित झाल्या.

मानवाने अत्यंत चतुराईने सूक्ष्मजीवांच्या जनुकांना हवे तसे संपादित करण्याची कला काळाच्या ओघात साध्य केली. यातूनच कृत्रिम जीवशास्त्रासारखे (सिन्थेटिक बायॉलॉजी) दुधारी शस्त्र मानवाच्या हाती लागले. कर्करोगासाठी ‘वाहक अभियांत्रिकी’चे तंत्र विकसित केले जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून हवे तसे सूक्ष्मजीव आणि प्रथिने यांच्या रचना (डिझाईन) तयार केल्या जात आहेत. यातूनच अनेक असाध्य रोगांवर नजिकच्या काळात उपचार उपलब्धी होऊ शकेल.

मात्र सावधान! जनुकांचे संपादन एखाद्या ‘सुपरबग’ला जन्माला घालू शकते. ही नैतिक जबाबदारी मात्र मानवाने स्विकारायला हवी. म्हणूनच सूक्ष्मजीवांचे हे नवे युग मानवासाठी भीतीचे नव्हे, तर सजगतेचे, समतोलाचे आणि सहअस्तित्वाचे आहे.

डॉ. रंजन गर्गे