१५ सप्टेंबर हा मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. २०१८ पासून मराठी विज्ञान परिषदेतर्फे अभियांत्रिकीतील कोणत्याही शाखेत संशोधन करुन त्या संशोधनाचा प्रत्यक्ष उपयोग करणाऱ्या, चाळीस अथवा त्यापेक्षा कमी वय असणाऱ्या अभियंत्याला मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी या पुरस्कारासाठी नऊ प्रवेशिका आल्या. यातील तीन प्रवेशिका अंतिम फेरीसाठी निवडण्यात आल्या. प्रा. ज्येष्ठराज जोशी, श्री.अ.पां. देशपांडे आणि श्री. मकरंद भोंसले या निवडसमितीने डॉ. सौरभ चंद्रकांत पाटणकर यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. मुंबई महानगरपालिकेबरोबर बागायती कचर्याची घनता वाढवण्याच्या प्रकल्पात डॉ. सौरभ पाटणकर यांचा सहभाग आहे. ‘सफाई मित्र’ हा अभ्यासक्रम त्यांनी तयार केला आहे. कृषी क्षेत्रातील टाकाऊ पदार्थांचे मूल्यवर्धन करण्याच्या क्षेत्रात त्यांचे संशोधन विशेष उल्लेखनीय आहे.
या पुरस्काराचे स्वरुप सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि रु. १०,०००/- असे आहे. दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सायं.५३० वाजता आय.सी.टी, मुंबई येथे पुरस्कार प्रदान कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.