अकरावे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन आणि व्ही. डी. चौगुले व मोरेश्वर मोहिले पारितोषिके

मराठी विज्ञान परिषदेतर्फे शालेय विद्यार्थ्यांकरिता अनेक उपक्रम घेण्यात येतात. त्यापैकी एक म्हणजे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन. १९९५ साली पहिले राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन मुंबईत यशस्वीरीत्या साजरे झाले. ह्या संमेलनाला मिळालेला चांगला प्रतिसाद पाहून मुंबईतील व्ही.डी. चौगुले फाउंडेशन फॉर रिसर्च अँड एज्युकेशन ट्रस्टतर्फे, तसेच कालांतराने परिषदेचे हितचिंतक सुनील मोहिले आणि कुटुंबीय यांच्याकडून मराठी विज्ञान परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एका योजनेस अर्थसाहाय्य मिळाले.

विद्यार्थ्यांनी सद्य:स्थितीतील वेगवेगळ्या प्रश्नांचा अभ्यास करावा, त्यावर विचार करून ते समजून घ्यावे, त्याची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करून (त्यावर काही तोडगा मिळतो का) निष्कर्षाप्रत यावे, ह्यासाठी या पारितोषिक योजनेची आखणी करण्यात आलेली आहे. इयत्ता आठवी ते दहावीकरिता व्ही.डी. चौगुले पारितोषिके आहेत. ही पारितोषिके प्रथम रु. ४,०००/-, द्वितीय रु. ३,०००/-, तृतीय रु. २,०००/- अशी असून याखेरीज पाच उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी रु. १,०००/- दिली जातील. याचप्रमाणे इयत्ता अकरावी व बारावीतील विद्यार्थ्यांसाठी मोरेश्वर मुकुंदराव मोहिले पारितोषिके आहेत. ही पारितोषिके प्रथम रु. ५,०००/-, द्वितीय रु. ४,०००/- आणि तृतीय रु. ३०००/- अशी असून याखेरीज तीन उत्तेजनार्थ पारितोषिके (प्रत्येकी रु. १०००/-) दिली जातील. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून पारितषिके देण्यात येतील. शिक्षकांच्या पारितोषिकाची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेच्या १० टक्के असेल.

पारितोषिकांची संख्या आणि निवड याबाबत मराठी विज्ञान परिषदेचा निर्णय अंतिम असेल.

महाराष्ट्र राज्यस्तरावर ही योजना १९९८ सालापासून तीन वर्षांतून एकदा अमलात आणली जाते. तसेच दर वेळी त्याला जोडून राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन आयोजित केले जात आहे. त्यानुसार २०२५-२०२६ या वर्षी ही चौगुले व मोहिले पारितोषिक योजना अमलात आणली जात असून त्याला जोडून अकरावे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन दि. १५, १६ व १७ नोव्हेंबर २०२५ रोजी वरोरा, जि. चंद्रपूर येथे आयोजित केले आहे. या संमेलनात सदर पारितोषिके वितरित केली जातील. यासाठी विद्यार्थ्यांनी – वरीलप्रमाणे गटानुसार – शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पू्र्ण केलेले प्रकल्प दि. १५ सप्टेंबर २०२५पर्यंत मराठी विज्ञान परिषदेकडे पाठवावेत. प्रकल्पाची मांडणी करताना परिषदेच्या अपेक्षा काय आहेत, त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्यावेत.

१.      प्रकल्पाचा विषय – तो निवडण्याचा उद्देश / कारणे
२.      या विषयावर पूर्वी झालेले काम – संबंधित माहिती (थोडक्‍यात)
३.      विषयाच्या अनुषंगाने संदर्भ वा माहिती कोणत्या मार्गाने गोळा केली (वाचन, मार्गदर्शन, कृतीद्वारे, अनुभवाने, प्रसारमाध्यमाद्वारे, इंटरनेटद्वारे इत्यादी). निव्वळ माहिती संकलन नको.
४.      संदर्भ – माहितीच्या आधारे कृती – प्रयोग रचना, प्रतिकृती (गरज असल्यास) कशी केली?
५.      निरीक्षण नोंदी – निरीक्षणाची मांडणी, मोजमापन व बारकावे कसे नोंदवले?
६.      सातत्याने कृती करून निरीक्षण पडताळणी – वेगवेगळ्या पद्धतीने  व / वा वेगवेगळ्या परिस्थितीत कृती करणे व निरीक्षणे नोंदवणे (विषयानुरूप ठरवावे)
७.      निरीक्षणाची मांडणी – तक्ते, आलेख इत्यादी पद्धतीने करावी. प्रश्नावलीचा वापर करून सर्वेक्षण केले असेल तर प्रश्नावलीचा नमुना जोडावा.
८.      निरीक्षणाचे वर्गीकरण – विषयाच्या अनुषंगाने कसे केले?
९.      निरीक्षणावरून निष्कर्ष कोणते काढले? त्याची कारणमीमांसा.
१०.    ज्या उद्देशाने प्रकल्प हाती घेतला, त्याला अनुसरून निष्कर्षाचे विवेचन अपेक्षित.
११.     निष्कर्षाच्या आधारे काही नवीन कल्पना सुचल्या का? जिथे आवश्यक असेल तिथेच प्रतिकृती करावी, अनिवार्य नाही.

अशा पद्धतीने पूर्ण केलेले प्रकल्प अहवाल (लिखाण, आकृत्या, रेखाचित्रे, तक्ते, आलेख इत्यादीसह) विद्यार्थ्यांने आपले पूर्ण नाव, घरचा पूर्ण पत्ता (पिनकोडसहित), भ्रमणध्वनी, इमेल आणि शाळेचे नाव व पत्ता, तसेच हा प्रकल्प सबंधित विद्यार्थ्यांने केला आहे असे शाळेच्या मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र आणि मार्गदर्शक शिक्षकाचा भ्रमणध्वनी (व्हॉट्सॅप) व इ-मेल यासह मराठी विज्ञान परिषद विज्ञान भवन, वि.ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२ येथे पाठवावा. (दूरध्वनी क्र. ०२२-४८२६३७५० / ४८२६ ००९४, भ्रमणध्वनी (व्हॉट्सॅप) ९९६९१००९६१ – साप्ताहिक सुट्टी मंगळवार) लिखाणासाठी ए-४ आकाराचा कागद वापरावा, तसेच प्रकल्प अहवाल १५ ते २० पानांचा असावा अशी अपेक्षा आहे. एका प्रकल्पाकरिता जास्तीत जास्त दोन विद्यार्थ्यांनी काम केल्यास चालेल, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी एका प्रकल्पात नकोत. मार्गदर्शनाच्या हेतूने मुद्दे सुचवले आहेत, विषयानुरूप सगळेच लागू होतील असे नाही, याची नोंद घ्यावी. प्रकल्प अहवालाची एक प्रत विद्यार्थ्यांनी स्वत:जवळ ठेवावी. प्रकल्प अहवाल परिषदेकडे पाठवताना दोन प्रती पाठवाव्या.

नमुना म्हणून काही विषय सुचवत आहे, पण या स्पर्धेला विषयाचे बंधन नाही.

विषयसूची

१.      तापमानवाढीची कारणे, त्याचे अनेकविध परिणाम आणि त्यावर उपाय (स्थानिक आणि जागतिक).
२.      पाणी समस्या – पाणीपुरवठा योजना, लोकसंख्या, जनावरसंख्या इत्यादींना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होतो का? नसल्यास पाणीपुरवठ्याचे उपाय, पाणीबचतीचे उपाय, पर्जन्य जलसंचयन (रेन वॉटर हार्वेस्टिंग).
३.      प्लास्टिक शाप की वरदान? उपयुक्तता व गैरसोय, गैरवापर, त्यावर तोडगा, पुनर्वापर, पुन:चक्रीकरण वगैरे.
४.      घनकचरा समस्या – शहरी / ग्रामीण भागात – दुष्परिणाम, ग्रामस्वच्छता अभियान, लोकसहभाग, उपयुक्तता व उपलब्धी, शहर स्वच्छता स्पर्धा, सहभाग व यश / अपयश.
५.      सार्वजनिक वाहतूक व्यवस्था योग्य व पुरेशी आहे का? फायदे तोटे उदाहरणासहित.
६.      एकूण सण-उत्सवात पर्यावरण रक्षणाचे धोरण, व्यावहारिक उपाय.
७.      दिवाळीत फटाके वाजवावेत का? फायदे, तोटे, प्रदूषण, अपव्यय, पर्याय.
८.      वीजपुरवठा – पुरेसा का कमी? कारणे, अडचणी, उपाय – तात्कालिक व कायमस्वरूपी.
९.      ऊर्जानिर्मिती – पारंपरिक की अपारंपरिक? योग्य / अयोग्य, सर्व अंगांनी किफायतशीर की महाग?
१०.    कागदाचा वापर आणि पर्यावरण – कागद बचतीचे वेगवेगळे उपाय, पुनर्वापराचे मार्ग, अन्य पर्याय.
११.     शेतकऱ्यांच्या समस्या – अडचणी, तोडगे – स्थानिक व सार्वत्रिक, अंमलबजावणी, लोकसहभाग, त्यासाठीचे मार्ग. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर.
१२.    आपल्या भागातील वृक्षसंपदा – वैशिष्ट्ये, गुणधर्म, उपयोग, सर्वेक्षण, सध्याचे वृक्ष स्थानिकरीत्या अनुकूल आहेत का? जीवविविधता.
१३.    स्थानिकरीत्या उपलब्ध भाज्या, फळे, धान्य यांचा अभ्यास – किती प्रमाणात स्थानिक उत्पादन, इतर ठिकाणाहून आणतो त्याचे उत्पादन गावात होऊ शकते का, स्थानिकरीत्या अनुकूल उत्पादन मोठ्या प्रमाणात बाहेर पाठवता येईल का? मार्ग कोणते? गावाच्या विकासात उपयुक्तता?
१४.     दैनंदिन जीवनातील विज्ञान आणि आपला दृष्टीकोन, वागणूक योग्य की अयोग्य.
१५.    सार्वजनिक आरोग्यव्यवस्था – पुरेशी आहे का? नसल्यास उपाय कोणते?
१६.    मोबाइल वापराचे फायदे व तोटे – यात सर्वेक्षणाचा अंतर्भाव असावा.
१७.    वायुप्रदूषण / जलप्रदूषण / ध्वनिप्रदूषण – कारणे व उपाय जागतिक तसेच स्थानिक (सर्वेक्षणाची जोड हवी.)

माहितीपत्रक डाऊनलोड


मराठी विज्ञान परिषदेतर्फे दर तीन वर्षांनी राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन भरवले जाते. त्याला जोडून विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प स्पर्धेचे आयोजन केले जाते. स्थानिक वा सार्वत्रिक समस्यांचे निराकरण विज्ञान-तंत्रज्ञान वापरून कसे करता येईल याचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचवावेत, असे प्रकल्पाद्वारे अपेक्षित असते. शालेय गटासाठी (इयत्ता आठवी ते दहावी) व्ही. डी. चौगुले पारितोषिके तर कनिष्ठ महाविद्यालयीन गटासाठी कै. मोरेश्वर मुकुंदराव मोहिले पारितोषिके दिली जातात. नुकतेच दहावे राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलन कळवा (ठाणे) येथे, मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभागाच्या यजमानपदाखाली संपन्न झाले. या वेळी विजेत्या ठरलेल्या प्रकल्पांची ओळख, दरवेळी एक, याप्रमाणे करून घेणार आहोत.