सु. त्रिं. तासकर पुरस्कार (२०२६)
मराठी विज्ञान परिषदेतर्फे ग्रामीण भागात विज्ञान शिक्षणाचे कार्य किमान दहा वर्षे करणाऱ्या संस्थेला “सु. त्रिं.तासकर पुरस्कार” २०२३ सालापासून दरवर्षी दिला जातो. या वर्षीच्या पुरस्कारासाठी चार प्रवेशिका आल्या होत्या. या पुरस्कारासाठी ठरवलेल्या निकषांनुसार परीक्षण करुन सु.त्रि.तासकर पुरस्कार (२०२६)साठी परीक्षक समितीने अध्ययन संस्था, मुंबई या संस्थेची निवड केली आहे. ह्या पुरस्काराचे स्वरुप रू. १ लाख, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे असून तो परिषदेच्या साठाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी प्रदान केला जाईल. परीक्षणाचे काम डॉ. विवेक पाटकर, श्री. विक्रांत घाणेकर आणि श्री. दिलीप हेर्लेकर यांच्या समितीने केले.
उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक (२०२६)
मराठी विज्ञान परिषदेतर्फे मराठीतील विज्ञानविषयक उत्तम पुस्तकाला दरवर्षी पारितोषिक दिले जाते. हे पारितोषिक नाशिकच्या ‘सायन्स फिचर्स’ यांनी पुरस्कृत केलेले असून यावर्षी जानेवारी २०२५ ते डिसेंबर २०२५ दरम्यान प्रकाशित झालेली विज्ञान पुस्तके पात्र होती. यासाठी २२ पुस्तके प्रवेशिका म्हणून आली होती, त्यातील १९ पुस्तके पात्र ठरली. त्यांचे परीक्षण मविप स्थायी समिती सदस्य डॉ. हेमंत जोगळेकर आणि श्रीमती संध्या ठाकूर यांनी केले. श्री. हेमंत साने यांनी लिहिलेल्या ‘मूलद्रव्यांच्या जादुई दुनियेत’ (लोक वाङमय गृह प्रकाशन,मुंबई) या पुस्तकाची निवड या पारितोषिकासाठी केली. या पारितोषिकाचे स्वरुप रुपये १,०००/- आणि प्रमाणपत्र असे असून परिषदेच्या साठाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात रविवार दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी हे पारितोषिक प्रदान केले जाईल.
सुधाकर उध्दवराव आठले पुरस्कार (२०२६)
समाजामध्ये विज्ञानप्रसार, तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवण्यासाठी विविध प्रकारे किमान दहा वर्षे काम करणाऱ्या, साठ वर्षाखालील व्यक्तीला परिषदेतर्फे दरवर्षी ‘सुधाकर उध्दवराव आठले ‘ पुरस्कार देऊन गौरवले जाते. या वर्षीच्या पुरस्कारासाठी सात प्रवेशिका आल्या होत्या. त्याचे परीक्षण स्थायी समिती सदस्य श्रीमती मृणालिनी साठे, श्रीमती किशोरी उंब्राळकर आणि कार्यवाह श्री. अ. पां. देशपांडे यांच्या समितीने केले. त्यांनी निवड केल्यानुसार सुधाकर उध्दवराव आठले पुरस्कार (२०२६) साठी श्रीमती सुषमा केणीन (कणकवली) यांना जाहीर झाला असून त्या पुरस्काराचे स्वरुप रू. २५,०००/- व सन्मानपत्र असे आहे. पुरस्कार परिषदेच्या साठाव्या वर्धापन दिन कार्यक्रमात दि. २६ एप्रिल, २०२६ रोजी प्रदान केला जाईल.