१९ जुलै हा प्रा.जयंत नारळीकर यांचा जन्मदिवस. नारळीकरांनी नुसत्याच स्वतः विज्ञानकथा लिहिल्या नाहीत तर त्याला मराठी साहित्यात एक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच ते २०२२ साली नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. मराठीतील विज्ञानकथा लेखकांचे ते नायक मानले जातात. मराठी विज्ञान परिषदेने २०२२ सालापासून १९ जुलै या डॉ. नारळीकरांच्या जन्मदिनी, राष्ट्रीय विज्ञानकथा दिन साजरा करण्याचे ठरवले. त्यासाठी खुद्द जयंतराव नारळीकरांची परवानगी घेतली.
या दिवशी शाळा, महाविद्यालये, वाचनालये, महिला मंडळे अशा सर्व संस्थांनी कार्यक्रम ठेवावेत. त्यासाठी खालील प्रकारचे कार्यक्रम ठेवता येतील.
१) मराठीत जेवढे विज्ञानकथा लेखक आहेत, त्यापैकी कोणाला बोलावून त्यांचे कथाकथन ठेवावे.
२) संस्थेतील कोणाही कार्यकर्त्याने प्रसिद्ध विज्ञानकथा लेखकांच्या कथांचे वाचन करावे.
३) कोणाही शिक्षकाने-विद्यार्थ्याने-अन्य नागरिकांनी लिहिलेल्या विज्ञानकथा-कवितांचे वाचन करण्याची संधी त्यांना द्यावी.
४) विज्ञानकथा लेखनाची स्पर्धा घेऊन उत्कृष्ठ कथांचे वाचन करावे.
५) विज्ञानकथेवर आधारित नाटक बसवून त्याचा प्रयोग करावा.
६) वैज्ञानिकांच्या कथा सांगाव्यात.
गेल्या तीन वर्षात झालेले कार्यक्रम
१) मराठी विज्ञान परिषदेने दूरदृश्य माध्यमवरून तीन-तीन विज्ञानकथा लेखकांच्या कथाकथनाचे कार्यक्रम आयोजित केले. त्यात स्वरा मोकाशी (पुणे), डॉ. आशिष महाबळ (अमेरिका), श्री. आकाश होगाडे (पुणे), डॉ. मानसी राजाध्यक्ष (मुंबई), श्री. असीम चाफळकर (दिल्ली) इत्यादींनी आपापल्या विज्ञानकथा सदर केल्या.
२) मुंबई मराठी साहित्य संघाने दरवर्षी मुंबईतील एका शाळेत विज्ञानकथा कथनाचा कार्यक्रम आयोजित केला.
३) साठ्ये महाविद्यालय, विलेपार्ले, मुंबई यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कथाकथन केले.
४) मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाने २०-२५ शाळेत कथाकथनाचे कार्यक्रम दरवर्षी केले.
५) इंडियन असोसिएशन फॉर सायन्स फिक्शन स्टडीज (IASFS), बेंगळुरू यांनी दरवर्षी एक आंतरराष्ट्रीय विज्ञान कथा अधिवेशन घेतले.
१९ जुलै २०२५ चे कार्यक्रम
१) सकाळी ९ वाजता – श्रीमती स्मिता पोतनीस याचे विज्ञानकथा कथन – झुनझुनवाला महाविद्यालय, घाटकोपर.
२) सकाळी ११ वाजता – कॅप्टन सुनील सुळे यांचे विज्ञानकथा कथन – शिरोडकर हायस्कूल, परळ.
३) संध्याकाळी ७ ते रात्री ८.३० –क्षितीज देसाई, उज्ज्वल राणे आणि सुधा रिसबूड यांचे विज्ञानकथा कथन – दूरदृष्य माध्यमाद्वारे
४) मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे अनेक शाळात विज्ञानकथा कथन
५) मराठी विज्ञान परिषद चाळीसगाव विभाग – शुभम देशमुख यांचे विज्ञानकथा कथन