अठ्ठावन्नावे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन

मराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेपासून म्हणजेच १९६६ सालापासून अखंडपणे होत असलेला उपक्रम म्हणजे अखिल भारतीय मराठी विज्ञान अधिवेशन (पूर्वीचे संमेलन). अखिल भारतीय असा उल्लेख करण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्र राज्याबाहेर ही अधिवेशने झाली आहेत. उदा. हैद्राबाद (१९७९), वडोदरा (१९७९ व १९९६) आणि गोवा (१९९७ व २०२२). कोविड -१९ चा काळही ह्या अधिवेशनांना थोपवू शकला नाही, इतकं कमालीचं सातत्य त्यात आहे. ठिकाणी-ठिकाणी असलेल्या परिषदेच्या स्थानिक विभागाच्या सहकार्याने ही अधिवेशने घेतली जातात. क्वचितप्रसंगी स्थानिक विभाग नसल्यास त्या-त्या ठिकाणच्या संस्थांच्या सहकार्याने ही अधिवेशने घेतली गेली. विभाग स्थापन झाल्यावर लागलीच अधिवेशनाचे आयोजन होणे तर काही ठिकाणी अधिवेशन झाल्यानंतर  विभाग स्थापन होणे अशीही उदाहरणे परिषदेच्या इतिहासात सापडतात.

अधिवेशन होणार असलेल्या पंचक्रोशीत विज्ञानप्रसाराचे वातावरण तयार व्हावे, विज्ञान-तंत्रज्ञान शेत्रातील नामवंत व्यक्तींचे विचार ऐकण्याची संधी स्थानिक जनतेला मिळावी आणि वैज्ञानिक विचारांची देवाण-घेवाण व्हावी ही प्रमुख उद्दिष्टे या अधिवेशने आयोजित करण्यामागे आहेत. अधिवेशनाच्या अध्यक्षपदी मराठी भाषिक शास्त्रज्ञ / तंत्रज्ञाची निवड केली जात असून अध्यक्षीय भाषणे मराठीत होतात, हे या अधिवेशनाचे वैशिष्ट्य असून अधिवेशनाचा केंद्रबिंदू म्हणून त्याकडे पाहिले जाते. १९९५ सालच्या अधिवेशनात श्री. अरविंद गुप्ता यांचे भाषण हिंदीत तर २०१० साली नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे भाषण इंग्रजीत झाले ते सन्माननीय अपवाद म्हणून.

अधिवेशनाच्या निमित्ताने प्रकाशित स्मरणिका, तसेच अधिवेशनात होणारे विविध कार्यक्रम उदा. परिसंवाद, व्याखाने, करमणुकीचे कार्यक्रम, शैक्षणिक सहली ही आणखी काही वैशिष्ट्ये होत.

मराठी विज्ञान परिषदेचे आगामी अधिवेशन दि. ९ ते ११ डिसेंबर २०२३ दरम्यान वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे. त्याच्या अधिक माहितीकरिता … (https://mavipanavimumbai.org/adhiveshan-2023/).