वर्धापनदिन वृत्तान्त
मराठी विज्ञान परिषदेचा सत्तावन्नावा वर्धापनदिन रविवार दि. ३० एप्रिल २०२३ रोजी विज्ञान भवनात साजरा झाला. प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) कुलगुरू प्रा.अनिरुद्ध पंडित उपस्थित होते. विज्ञान गीताने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात प्रथम विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातील पाच नामवंताना परिषदेचे सन्मान्य सभासदत्व बहाल करण्यात आले. डॉ. विजय गुपचूप (अभियांत्रिकी तज्ज्ञ), डॉ. बाळ फोंडके (बिनीचे विज्ञान लेखक व प्रसारक), डॉ. केतन गोखले (रेल्वे तज्ज्ञ), डॉ. अभय बंग (वैद्यकीय संशोधन व समाजकार्य) आणि श्री. अरविंद गुप्ता (कृतीशील विज्ञान प्रसारक) यांची निवड केली होती. त्यापैकी डॉ. बाळ फोंडके यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सन्मान स्वीकारला आणि हा ‘घरचा आहेर’ म्हणजे घरच्यांनी दिलेली कौतुकाची थाप आहे, अशी भावना व्यक्त केली. डॉ. केतन गोखले व श्री. अरविंद गुप्ता यांनी सन्मान्य सभासदत्व स्वीकारत दूरदृश्य माध्यमाद्वारे कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांचा परिषदेच्या कामाशी असलेला अनेक वर्षांचा संबंध अधोरेखित केला. डॉ. विजय गुपचूप आणि डॉ. अभय बंग हे त्यांच्या वैयक्तिक अडचणींमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. सन्मानपत्रांचे वाचन श्रीम. किशोरी उंब्राळकर, श्री. अभय यावलकर व डॉ. हेमंत जोगळेकर (तिन्ही स्थायी समिती सभासद) यांनी केले.
ग्रामीण भागात विज्ञान शिक्षण क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या संस्थेला दिला जाणारा परिषदेचा सु.त्रिं. तासकर पुरस्कार ‘विज्ञान आश्रम’ (पाबळ, जि.पुणे) या संस्थेला प्रदान करण्यात आला. या पुरस्काराची पार्श्वभूमी सांगत, अवलंबलेल्या निवड प्रक्रियेवर प्रकाश टाकण्याचे काम कार्यवाह श्री.अ.पां. देशपांडे यांनी केले. विज्ञान आश्रमाच्या वतीने श्री. योगेश कुलकर्णी यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत परिषदेबरोबर दीर्घकाल असलेल्या संबंधांचा आढावा मांडला. त्यात माजी कार्यवाह कै. चिं.मो.पंडित व विद्यमान अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी यांचे विज्ञान आश्रमाशी असलेले नाते उलगडले. विज्ञान आश्रमाचे काम गावागावात उपयुक्त असे व्यावसायिक प्रशिक्षण देणे आणि ग्रामीण भागातील इतर उपयोगी व्यवसायासाठी तयार करणे असे आहे.
विज्ञान प्रसार कार्यासाठी देण्यात येणारा सुधाकर उद्धवराव आठले पुरस्कार डॉ. नंदा हरम (पुणे) यांना त्यांच्या विविधांगी विज्ञान प्रसार कार्यासाठी प्रदान करण्यात आला. पुरस्काराची पार्श्वभूमी सांगत मानपत्राचे वाचन डॉ. विवेक पाटकर (स्थायी समिती सदस्य) यांनी केले. डॉ. नंदा हरम यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत या पुरस्कारामुळे जबाबदारी वाढल्याचे मत मांडले.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचे तीन विज्ञान संशोधन पुरस्कार त्यानंतर वितरित करण्यात आले. यामध्ये १) चौधरी खतिजा खातून (प्रिं.के.एम.कुंदनानी कॉलेज ऑफ फार्मसी, मुंबई) – प्रकल्प : बाळाला अंगावरचे दूध पाजणाऱ्या मातांसाठी शक्तिधारी न्यूट्रिबारची निर्मिती आणि त्याचे मूल्यमापन; कृतिका खुँटेटा, अमेय हेबळे व अरीबा नदीम (डॉ. डी.वाय. पाटील बायोटेक्नॉलॉजी अ़ॅण्ड बायोइन्फोर्मेटिक्स इन्स्टिट्यूट ,पुणे) – प्रकल्प : अनुवांशिक व्याधींचे शिशुवयातच निदान करण्यासाठी वापरता येणाऱ्या, नखांवर आधारलेल्या पद्धतीचा पडताळा; साक्षी कुंभार, पार्थ आरोलकर व केओला कपितान (विल्सन महाविद्यालय, मुंबई) – प्रकल्प : पाण्याचे साठे प्रदूषित करणाऱ्या जडधातूंचा शोध घेण्यासाठी, ‘बोंबील’ या माशातून मिळवलेल्या जीवाणूंचा वापर. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रा. नीलेशकुमार शर्मा (पुणे) आणि डॉ. जॉयलीन मस्करेन्हस (मुंबई) यांनाही गौरवण्यात आले. विज्ञान संशोधन पुरस्कारांची पार्श्वभूमी सांगत सन्मानपत्रांचे वाचन डॉ. राजीव चिटणीस (पुरस्कार समन्वयक) यांनी केले. तसेच डॉ. चिटणीस यांनी पुरस्कार विजेत्या विद्यार्थ्यांना नेमके प्रश्न विचारून त्यांच्या संशोधन प्रकल्पांची ओळख उपस्थितांना करुन दिली. परिषदेचे उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक (नाशिक विज्ञान लेखक संघ पुरस्कृत) डॉ. मृदुला बेळे लिखित ‘अशी ही एक झुंज’ (राजहंस प्रकाशन) यांना देण्यात आले. या पारितोषिकाची माहिती सांगत यावर्षीचे नाशिक विज्ञान लेखक संघाचे पारितोषिक नाशिकच्या लेखिकेला मिळाला असल्याचा योगायोग श्री. विजय लाळे (स्थायी समिती सदस्य) यांनी सांगितला. विजेते पुस्तक, एका भारतीय औषध कंपनीने जनसामान्यांसाठी जागतिक पातळीवरील बलाढ्य शक्तींशी दिलेल्या यशस्वी लढ्याची समाजाला विस्ताराने ओळख करुन देते.
यानंतर परिषदेतर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या चार इ-पुस्तकांची ओळख करून देऊन परिषदेच्या इ-पुस्तक योजनेची माहिती कार्यवाह श्री. दिलीप हेर्लेकर यांनी दिली. प्रमुख पाहुणे प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी पडद्यावर चारही इ पुस्तकांची मुखपृष्ठे दाखवून त्यांचे औपचारिक प्रकाशन केले. ‘गणितासंगे प्रवास’ या पुस्तकाच्या संपादक डॉ. मेधा लिमये यांनी तसेच मारी क्युरी यांच्या संक्षिप्त चरित्राचा अनुवाद करणाऱ्या डॉ. मालिनी नाडकर्णी यांनी आपापल्या पुस्तकांसंबधी मनोगत मांडले. तर विज्ञानमार्ग २०२१ व विज्ञानमार्ग २०२२ या पुस्तकांची वैशिष्ट्ये श्रोत्यांना सांगण्यात आली.
प्रमुख पाहुणे प्रा. अनिरुद्ध पंडित यांनी ‘शाश्वत तंत्रज्ञान’ या विषयावर आपले विचार मांडताना तंत्रज्ञान वापराविषयी कालमर्यादा लक्षात घेऊन ते शाश्वत कसे होईल, याकडे लक्ष द्यायची गरज असल्याचे सांगितले. तसेच निसर्गातील अनेक उपयुक्त प्रक्रियांचा उललेख करत त्यांचा वापर आताही करायला हवा असे सुचवले. हे करताना त्या प्रक्रियेचा कालावधी कमी करायचा असेल तर उत्प्रेरकांचा वापर करावा असे सुचवले. मानवी हस्तक्षेपामुळे निसर्गातील अन्न साखळ्यांवर कसा परीणाम होते हे विषद करताना एका निसर्गपटाची माहिती दिली. प्रा. पंडित यांनी जाता जाता त्रिसूत्री सांगितली. ती म्हणजे निसर्गच आपल्याला शिकवतो, त्याच्याकडून शिका त्याचे निरीक्षण करा, निरीक्षणाचा खोलवर विचार करा आणि निरीक्षण शक्ती वाढवा, असा सल्लाही त्यांनी दिला.
परिषदेचे अध्यक्ष प्रा. ज्येष्ठराज जोशी यांनी प्रास्ताविक करत सुरू झालेला वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सांगता श्री. राजेश समेळ (व्यवस्थापकीय संचालक) यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने झाली. प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणाली यांचा संमिश्र वापर करत झालेल्या कार्यक्रमाचे समर्पक सूत्रसंचालन श्रीमती सुचेता भिडे (विज्ञान अधिकारी) यांनी केले. परिषदेच्या दहा विभागांच्या प्रतिनिधींसह शंभराच्यावर विज्ञान प्रेमींची प्रत्यक्ष उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली.
— सुचेता भिडे
मराठी विज्ञान परिषदेचा सत्तावन्नावा वर्धापनदिन रविवार, दिनांक, ३० एप्रिल २०२३ रोजी विज्ञान भवनात, सकाळी १०.०० वाजता ते दुपारी ०१.३० या वेळेत साजरा केला जाईल.
या कार्यक्रमासाठी रेल्वेतज्ज्ञ डॉ. केतन गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात डॉ. विजय गुपचूप, डॉ. बाळ फोंडके, डॉ. केतन गोखले, डॉ. अभय बंग आणि श्री. अरविंद गुप्ता यांना परिषदेचे सन्मान्य सभासदत्व प्रदान केले जाईल.
तसेच या कार्यक्रमात सु. त्रिं. तासकर पुरस्कार, सुधाकर आठले पुरस्कार, विज्ञान संशोधन पुरस्कार आणि उत्तम विज्ञान पुस्तक पारितोषिक, यांचे वितरण करण्यात येईल. या शिवाय परिषदेच्या तीन इ-पुस्तकांचे प्रकाशनही केले जाईल.
त्यानंतर डॉ. केतन गोखले यांचे ‘काश्मीर रेल्वे’ या विषयावर व्याख्यान होईल.
सर्वांना या कार्यक्रमाचे हार्दिक निमंत्रण.