ज्येष्ठ विज्ञान साहित्यिक डॉ. जयंत नारळीकर यांचे मराठी विज्ञान कथाक्षेत्रातील योगदान लक्षात घेता, त्यांचा वाढदिवस (१९ जुलै) राष्ट्रीय विज्ञान कथा दिन म्हणून साजरा केला जातो.
मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथा हा कविता, नाटक, चरित्रे यांसारखा एक वेगळा साहित्य प्रकार सुरु होऊन आता ५० वर्षे झाली. त्याचे जाहीर कौतुक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दुर्गा भागवत, पु.ल.देशपांडे आणि पु.भा.भावे यांनी केले होते. डॉ. जयंत नारळीकर, डॉ.बाळ फोंडके, श्री. निरंजन घाटे, श्री.सुबोध जावडेकर यांसारख्या विज्ञानकथा लेखकांनी या साहित्य प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली. आता बहुसंख्य दिवाळी अंकात विज्ञानकथांचा आवर्जून समावेश असतो. तरीही रुजलेला हा साहित्य प्रकार प्रवाही ठेवण्याकरिता राष्ट्रीय विज्ञान कथा दिन साजरा करण्याची आवश्यकता असून मराठी विज्ञान परिषदेने १९ जुलै हा डॉ. जयंत नारळीकरांचा जन्मदिन, राष्ट्रीय विज्ञानकथादिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. महाराष्ट्रातील जागोजागच्या साहित्य व विज्ञान संस्थांनी या दिवशी विज्ञानकथा स्पर्धा, विज्ञानकथा वाचन, विज्ञानकथा कथन, चर्चा, परिसंवाद, भाषणे असे कार्यक्रम ठेवावेत असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले होते. त्यानुसार सन २०२२पासून १९ जुलै हा दिवस राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून साजरा केला जात असून महाराष्ट्रात ठिकठिकाणी होणारे कार्यक्रम होत असून त्यांची संख्या वाढती आहे. या उपक्रमाचे यंदाचे हे तिसरे वर्ष आहे.