राष्ट्रीय विज्ञानकथा दिन

मराठी साहित्यामध्ये विज्ञानकथा हा कविता, नाटक, चरित्रे यासारखा एक वेगळा साहित्य प्रकार सुरु होऊन आता ५० वर्षे झाली. त्याचे जाहीर कौतुक मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दुर्गा भागवत, पु.ल.देशपांडे आणि पु.भा.भावे यांनी त्या-त्या वेळी केले होते.

डॉ. जयंत नारळीकर, डॉ. बाळ फोंडके, श्री. निरंजन घाटे, श्री. सुबोध जावडेकर, श्री. लक्ष्मण लोंढे, डॉ. मेघश्री दळवी या विज्ञानकथा लेखकांनी या साहित्य प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून दिली.

आता बहुसंख्य दिवाळी अंकांना त्यांच्या अंकात विज्ञानकथा आवर्जून हवी असते. सध्या महाराष्ट्रात मराठीतून विज्ञानकथा लिहिणारे लेखकही पन्नासच्यावर आहेत. तरीही हा साहित्यप्रकार अजूनही चांगल्या पद्धतीने रुजावा तसेच विज्ञान कथालेखकांची नवी फळी तयार व्हावी म्हणून राष्ट्रीय विज्ञानकथादिन साजरा करण्याची कल्पना मूळ धरू लागली. त्यातूनच मराठी विज्ञान परिषदेच्या पुढाकाराने १९ जुलै हा डॉ. जयंत नारळीकरांचा जन्मदिन, राष्ट्रीय विज्ञानकथा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

राष्ट्रीय विज्ञानकथा दिन साजरा करण्याचे यंदाचे हे दुसरे वर्ष असून महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या साहित्य तसेच विज्ञान संस्थांनी या दिवशी ‘विज्ञानकथा’ विषयाला अनुसरून निरनिराळे कार्यक्रम आयोजित करावेत, असे जाहीर आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले. इंडियन असोसिएशन फॉर सायन्स फिक्शन स्टडीज (बंगळुरू) यांच्यासह महाराष्ट्रातील ८ -१० संस्थांनी त्याला सक्रीय प्रतिसाद दिला असून मुंबई मराठी साहित्य संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), मराठी विज्ञान परिषदे पुणे, औरंगाबाद, राजारामनगर हे विभाग आणि मुंबईतील काही महाविद्यालयांचा प्रामुख्याने समावेश आहे.