भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पुरस्कार, २०२३

या पुरस्कारासाठी यावर्षी सात प्रवेशिका आल्या. दिनांक ७ सप्टेंबर २०२३ रोजी याची पहिली सभा झाली. प्रा. ज्येष्ठराज जोशी, श्री. अ.पां. देशपांडे, श्री. शशिकांत धारणे आणि श्री. मकरंद भोंसले या पुरस्कार निवड समितीने या प्राथमिक फेरीत चार स्पर्धकांची निवड केली. दिनांक १२ सप्टेंबर २०२३ रोजी या स्पर्धकांची सादरीकरणे झाली. त्यातून श्री. अभिजीत खंडागळे यांची निवड करण्यात आली.  

मराठी विज्ञान परिषदेचा, “भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पुरस्कार” २०२३ – विजेता : 

 श्री. अभिजित खंडागळे 

अभिजित, यांनी नागपूरहून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि ते शिक्षण घेत असताना जाणवलेल्या अडचणीवर मात करण्यासाठी ‘वृक्ष एको सिस्टीम’ आणि ‘एकत्र’ या संस्था सुरू केल्या. त्यांद्वारे, त्यांनी सार्वत्रिक शिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आणि त्याला परदेशातूनही मागणी आली. 

मोबाइल फोनच्या माध्यमातून शिक्षण देताना, वंचित समाजातील व्यक्तींना उपलब्ध नसलेल्या जलद इंटरनेट सुविधेचा प्रश्न प्रामुख्याने जाणवतो. यावर ‘एकत्र’च्या माध्यमातून एक यशस्वी पर्याय अभिजित खंडागळे आणि त्यांच्या चमूने शोधला आहे. ‘एसएमएस’ किंवा ‘व्हॉट्सॲप’सारख्या सर्वांना उपलब्ध असलेल्या माध्यमांतून हे शिक्षण विद्यार्थ्याची पातळी, गरज आणि भाषा यांची दखल घेऊन संवादाच्या माध्यमातून दिले जाते. त्याचप्रमाणे, यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून संगणक वाचू शकेल अशा कोणत्याही शैक्षणिक साहित्याच्या मदतीने, योग्य असा शैक्षणिक अभ्यासक्रम अल्पावधीत तयार केला जातो. 

यासाठी विद्यार्थ्याला होणारा खर्च हा सर्व घटकांतील विद्यार्थ्यांना सहज परवडणारा आहे. याच्या साहाय्याने शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत कोणताही अभ्यासक्रम अत्यंत अल्पावधीत तयार करून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे शक्य झाले आहे.

    शिक्षणाचे सार्वत्रिकरण करताना भासलेल्या अडचणीवर मात करण्याचा एक मार्ग  काढण्याचा हा त्यांचा उपक्रम अभिनव आहे.